माझा आवडता बाप्पा… सगुण आणि निर्गुण

>> सुप्रसिद्ध गायक संजीव चिमलगी

– तुमचं आवडतं दैवत – फक्त गणेशाची मूर्तीच असं नाही, तर निराकार गणपतीशी एक तत्त्व म्हणून माझं नात आहे.
– त्याचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं? – मी गणेश वंदना गातो. आमच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीगणेशाच्या स्तवनाने सुरुवात होते.
– संकटात तो कशी मदत करतो ? – संकट जाणवतच नाही. मी ओंकारचं ध्यान करतो. तेही त्याचंच स्वरूप आहे. बळ मिळतं.
– कला आणि भक्तीची सांगड कशी घालता? – गणपती कलेचं दैवतच आहे. त्याला जेव्हा मूर्ती स्वरूपात बघतो तेव्हा तो सगुण असतो. जेव्हा नादातून त्याची उपासना करतो तेव्हा तो निर्गुण आणि निराकार असतो. अशी माझी साधना आहे.
– त्याच्यावर रागवता का? – नाही. असं कधी होत नाही.
– देवबाप्पा तुमचे लाड कसे पुरवतो? – एखादी गोष्ट हवी असते आणि ती काहीही न करता घडून येते असं माझ्या आयुष्यात बऱयाचदा झालंय.
– आवडत्या दैवतेचं कोणतं स्वरूप आवडतं? – ओंकार आणि नादस्वरूप आवडतंच. म्हणून घरी बालगणपतीच आणतो.
– त्याच्यापाशी काय मागता? – खरं तर काहीही मागत नाही. कारण सर्वच तो न मागता देतो. समर्पण करतो.
– त्याची नियमित उपासना कशी करता? – ओंकारसाधना करतो. पण ती ठरावीक अशा वेळेत नाही. कधीही करतो.

– आवडत्या दैवताला प्रार्थना केली आणि यश मिळालं असा प्रसंग?
एकदा दादर-माटुंगा कल्चरल सेंटरला कार्यक्रम होता. कसा आवाज लागणार असं वाटलं होतं. मी गणपतीचं ध्यान केलं. तेव्हा त्याची शक्ती मला जाणवली. अचानक बळ येऊन घसा मोकळा झाला. माझ्या सर्वात यशस्वी कार्यक्रमांपैकी तो
एक कार्यक्रम आहे.