वास्तुशास्त्राप्रमाणे ‘असे’ असावे स्वयंपाकघर

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई, ज्योतिष आणि वास्तूशास्त्र विशारद

वास्तू-टिप्स संदर्भात लिहिलेल्या मागील लेखानंतर वाचकांची ई-पत्र आली. काहींनी वास्तूवर लेख लिहिल्याबद्दल आभार मानले आहेत, काहींनी वास्तू परिक्षणासाठी बोलावले आहे, काहींनी त्यांच्या राहत्या वास्तुसंदार्भात प्रश्न विचारले आहेत. पुन्हा एकदा ह्या लेखाच्या निमित्ताने मी इथे नमूद करते की ह्या सर्व टिप्स घर घेतानाच उपयोगी पडतील. ज्यांची वास्तू शास्त्राप्रमाणे नाही त्यांच्यावर फार मोठ संकट कोसळणार असे अजिबात नाही. जर काही दोष असतील तर मात्र वास्तू संदर्भात उपाय योजना करावी. म्हणजेच समजा तुमचे स्वयंपाक घर ईशान्येला असणे, टॉयलेट्स उत्तर दिशेत असणे ह्यासाठी मूळ बांधकामाला धक्का न देता (तोडफोड न करता) उपाय शास्त्रात आहेत. तेंव्हा फार घाबरून जाऊ नका.

तर आज वळूया स्वयंपाक घराकडे. स्वयंपाकघर म्हणजे घरातील सर्वात महत्वाचा घटक. भारतीय संस्कृतीत स्वयंपाक घराला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. घर छोटे असले अगदी झोपडे असले तरी खोपट्यात चूल ही मांडलेलीच असते. भारतीय संस्कृती आणि वास्तू शात्राप्रमाणे बाहेरील प्रज्वलीत अग्नि आणि पोटातील अग्नि ह्याचा संबंध आहे. पोटातील अग्नीचे प्रमाण हे समतोल असावे. म्हणजेच अग्नि योग्य प्रमाणात असेल तर अन्न व्यवस्थित पचते आणि शरीरात वायू धरत नाही. आणि जर अग्निचा समतोल बिघडून त्याचे प्रमाण वाढले तर पूर्ण शरीरास हानी पोहोचू शकते. त्यामुळेच वास्तूतही आग्न्येय दिशेत स्वयंपाक घर असेल तर आपणास उत्तम आरोग्य लाभते.

१) ओटा कुठे असावा – ओटा पूर्व दिशेला आणि दक्षिणेला असावा. ( L – Shape ) शेगडी कुठे असावी – शेगडी ही आग्न्येय दिशेत असावी परंतु गृहिणीचे मुख स्वयंपाक करतांना पूर्व दिशेत येईल अशी व्यवस्था असावी.

२) खिडकी कुठे असावी – स्वयंपाक घरात खिडकीची रचना पूर्व दिशेत असेल तर उत्तम.kitchen

३) सिंक कुठे असावे – सिंकची रचना ईशान्य (North-East) दिशेत असावी.

४) पाण्याचा माठ – पाणी साठवण्याची जागा – पाण्याचा माठ ईशान्य (North-East) दिशेत उत्तम. पाण्याचा साठा ईशान्य आणि उत्तर दिशेत असावा.

५) फ्रीज – फ्रीज नैऋत्य दिशेत असावा. नैऋत्य दिशेत नसेल तर किमान दक्षिण किंवा पश्चिम दिशेत असावा.

६) मायक्रोवेव्ह – ह्या सारखी तत्सम बाकी उपकरणे पूर्व -दक्षिण (South-East )भागात ठेवावीत.

७) धान्य साठा – साठवणीची धान्य जसे, गहू,तांदूळ वगैरे ह्यांची साठवण दक्षिण (South ) ओट्या खाली असावी.

८) फरशीचा रंग – स्वयंपाक घरात फरशीचा रंग हा फिक्कट असावा. पिवळ्या आणि पांढऱ्या रंगातील छटा चालतील. भिंतींचा रंग फिक्कट हिरवा, भगवा पिवळा ह्यांच्या छटेत असावा. फार गडद लाल, भगवा शक्यतो असून नये.

furniture९) फर्निचर – स्वयंपाकघरातील फर्निचर बनवतांना शक्यतो फर्निचरचे कोपरे (Moulding )हे अणुकुचीदार असून नयेत. हल्ली कोपरे गोल आकारातही बनवून मिळतात. फर्निचरचा रंग गडद लाल, काळा असून नये. हलके रंग आणि शक्यतो फिक्कट हिरवा, पिवळा, पांढरा असेल तर उत्तम. गृहिणीला स्वयंपाक करतांना प्रसन्न वाटले पाहिजे.

१०) स्वच्छता – सर्वात महत्वाचे म्हणजे स्वयंपाक घरात स्वच्छता असावी. वेळोवेळी झालेली साफसफाई स्वयंपाक घरातील सकारत्मक ऊर्जा वाढवते. उरलेल्या गोष्टी, नको असलेल्या गोष्टी लगेच निकालात लावून घेणे. फार साठा होऊ देऊ नये.

हल्ली स्वयंपाक घरातही “Lively” वाटावे म्हणून शोभेची फुलांची (खरी) छोटी रोपे लावण्याची फॅशन आहे. तुम्ही सुद्धा त्याचा वापर करून पाहावा. स्वयंपाक घरातील प्रसन्नता वाढण्यास मदत होईल.
आपल्या स्वयंपाक घरात स्वयंपाकामुळे आणि साठवणीच्या (कांदे-लसूण )गोष्टींमुळे एक प्रकारचा वास येत असतो. त्यासाठी सुगंधीत गोष्टींचा वापर व्हावा. (परफ्युमस नाहीत. त्यात ज्वलनशील पदार्थ असतो)

जेवढी महत्वाची माहिती देत येईल तेवढी इथे नमूद केली आहे. वाचकांना ह्याचा जरूर फायदा होईल अशी अपेक्षा.

तुम्हाला ब्लॉग कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा: [email protected]