अहमदाबाद: घरांवर ‘X’च्या विशिष्ट खुणा, मुस्लिमांमध्ये प्रचंड दहशत आणि घबराट

सामना ऑनलाईन | अहमदाबाद

पलदी परिसरातील मुस्लीम वसाहतींमधील घरांवर लाल रंगाच्या ‘X’च्या विशिष्ट खुणा रातोरात आढळून आल्याने येथील मुस्लीमांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. याच परिसरात काही दिवसांपूर्वी ‘ येथे मुस्लीम वस्ती तयार होत आहे’ अशा आशयाचे वादग्रस्त पोस्टर लागले होते. त्यामुळे येथील वातावरणात प्रचंड दहशत आणि भीती पसरली आहे. खुणा केलेल्या घरांवर कधीही हल्ला होईल या भीतीने येथील नागरिक रात्रभर झोपलेले नाहीत.

निवडणुकीत मुस्लीम समाजाकडून मतदानाची कोणतीही अपेक्षा नसलेल्या गुजरातमधील एका पक्षाकडून ‘चुन चुन कर मुस्लीम परीवारोंको मारने की ये कोई साजिस तो नहीं,’ या भयगंडाने पछाडलेल्या नागरिकांची समजूत काढण्यासाठी या खुणा नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केल्या, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. कचरा उचलला की नाही, हे कळावे या करिता स्वच्छता अभियानांतर्गत या खुणा केल्याचे आरोग्य अधिकारी नितीन प्रजापती यांचे म्हणणे आहे.

रहिवाशांनी याबाबत निवडणूक आयोग आणि पोलीस आयुक्तांना पत्रही पाठवले आहे. परिसरातील शांतता भंग करण्याचा हा कट असावा, असेही त्यात म्हटले आहे. अमन वसाहत, नशेमॅन अपार्टमेंट, टागोर फ्लॅट, आशियाना अपार्टमेंट, तक्षशिला वसाहत यांच्या बाहेरील प्रवेशद्वारांवरही अशा प्रकारच्या खुणा केल्या आहेत. अशा प्रकारांमुळे शांतता भंग होऊ नये यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी विनंती निवडणूक आयोग आणि पोलीस आयुक्तांना केली आहे, असे आदिल बगादिया या स्थानिकाने सांगितले. नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या खुणा केल्याचे अमन कॉलनीतील रहिवासी जुबेर अहमद यांना मान्य नाही. पालिकेकडून अशी कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आली नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त ए. के. सिंह यांनी दिली.