भिवंडीतील अग्नितांडवाचे गौडबंगाल काय? सहा महिन्यांत 485 आगी

1
bike-fire-pic

सामना प्रतिनिधी, भिवंडी

भिवंडीच्या काल्हेरमध्ये ब्रश बनवणाऱया कारखान्याला आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत पाच गोडाऊन जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भिवंडीत वारंवार घडणाऱया अग्नितांडवाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात गेल्या सहा महिन्यांत 485 आगीच्या घटना घडल्या असून यामध्ये अनेक कारखाने आणि शेकडो गोदामे जळून खाक झाली आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात भिवंडीकरांना या अग्नितांडवाचा अनुभव येत असून प्रत्येक दोन तीन दिवसांमध्ये लागणाऱ्या या आगीच्या मागे नेमके गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यंत्रमाग नगरी म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात गेल्या काही वर्षांत अनधिकृत कारखाने व बेकायदा गोदामांची गर्दी झाली आहे. सर्व नियम आणि अटी धाब्यावर बसवून सुरू असलेल्या कारखान्यांमध्ये अत्यंत घातक रसायनांचा वापर केला जात आहे. या ज्वलनशील केमिकल्स आता भिवंडीकरांच्या जिवावर उठत असल्याचे वारंवार लागणाऱया आगीच्या घटनांवरून स्पष्ट होत आहे.

दोन वर्षांपूर्वी भिवंडी-ठाणे महामार्गावरील एका वखारीत लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दापोडा येथे लागलेल्या आगीत तीन कामगारांना जीव गमवावा लागला. अग्नितांडवाची ही मालिका येथेच थांबली नसून दर आठवडय़ाला भिवंडीत एकतरी मोठी आग लागत आहेत.

यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक होत आहे. विम्याची रक्कम वसूल करण्यासाठी मालकच कारखान्यांना व गोदामांना आगी लावत असल्याची चर्चा आहे. मात्र बहुतेक कारखाने अनधिकृत असल्याने त्यांना विमा संरक्षणाविषयीही संशय व्यक्त केला जात आहे.

बेकायदा 10 लाख गोदामे
भिवंडी तालुक्यातील काल्हेर, कशेळी, राहनाळ, वळगाव, गुंदवली, दापोडा, माणकोली, अंजूर, केवणी, कोपर, दिवे-अंजूर, वेहळे, ओवळी, सरवली, कोनगाव, पिंपळास, सोनाळे, भोईरगाव, वाहुली, सापे, पडघा, वडपे, कुरुंद, डोहळे अशा विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीतील सरकारी व महसूल खात्याच्या जमिनींवर भूमाफियांनी अतिक्रमण करून सुमारे 10 लाख 35 हजार गोदामे उभारली आहेत. बेकायदेशीरपणे रासायनिक द्रव्याची मोठय़ा प्रमाणात साठवणूक होत असल्यामुळे आगीच्या घटना वाढत असल्याचा ठपका ठेवत शासनाने कारवाईचे आदेश दिले होते. मात्र त्याकडे महसूल व पोलीस विभाग दुर्लक्ष करत असल्याने या गोदामांना अभय मिळाले आहे.

नागरी वस्तीत मोती कारखाने
सरकारी जमिनी हडपल्यानंतर अनेक नागरीवस्तीमध्ये छोटेमोठे कारखाने राजरोसपणे धडधडत आहेत. यामध्ये मोठय़ा प्रमाणात मोती कारखाने आहेत. ज्वलनशील पदार्थांपासून मोती, मणी बनवले जात असल्याने नागरीवस्त्याही धोक्याच्या उंबरठय़ावर आहेत.