काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन.डी. तिवारी व्हेंटिलेटरवर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री नारायण दत्त तिवारी (९२) यांची प्रकृती खालावली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तिवारी यांच्यावर सप्टेंबर महिन्यापासून दिल्लीतील मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र रविवारी त्यांचा रक्तदाब खूपच कमी झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलविण्यात आले.

सप्टेंबर महिन्यात तिवारी हे चहा पिता पिता बेशुद्ध झाले होते, त्यानंतर त्यांना मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचे निदान करण्यात आले होते. तेव्हापासून या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. २६ ऑक्टोबर रोजी तिवारी यांना न्युमोनिया झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. त्यानंतर रविवारी त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून पुढील २४ तास महत्त्वाचे आहेत, असे मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. तिवारी यांच्यावर मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे न्युरोसर्जन डॉक्टर जेडी मुखर्जी आणि हृदयविकारतज्ज्ञ डॉक्टर सुमीत सेठी हे उपचार करत आहेत.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते असलेले नारायण दत्त तिवारी हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जवळचे व्यक्ती होते. देशातील ते एकमेव असे नेते आहेत जे दोन राज्यांचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तिवारी हे उत्तरप्रदेश व उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. तसेच तिवारींचे खासगी आयुष्य कायम वादात राहिले आहे.