कोकणातील नाचणी (नागली) आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पोहोचणार

सामना प्रतिनिधी, खेड

कोकणच्या लाल मातीत पिकणारी आणि पौष्टिक आहार म्हणून मानली जाणारी कोकणातील नाचणी (नागली) लवकरच आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पोहोचणार आहे. काही बचत गटांनी नाचणीसत्वापासून तयार केलेले दिवाळी फराळाचे पदार्थ परदेशात पाठविल्यानंतर रोम येथील इंटरनॅशनल फंड फॉर ऑग्रिकल्चर डेव्हलपमेंट या संस्थेने नाचणी पिकाची दखल घेतली. या संस्थेचे अधिकारी स्टिफन आणि जेनिफर यांनी नुकतीच आंबये गावाला भेट देऊन नाचणी पिकाची पाहणी केली.

शेती करण्याबाबतची मानसिकता दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. त्यामुळे नाचणी हे अंत्यत महत्त्वाचे पीक दुर्लक्षित झाले आहे. या पिकाचे महत्त्व अबाधित राहावे यासाठी खेडमधील काही बचत गटांनी एकत्र येऊन नाचणी पीक घेण्याचा निर्णय घेतला. खेड शहरापासून दहा कि. मी. अंतरावर असलेल्या आंबये गावी सुमारे आठ एकर जागा भाडेतत्त्वावर घेऊन नाचणी पिकाची लागवड करण्यात आली.

बचत गटाच्या सर्वच सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे पहिल्याच वर्षी भरघोस पीक आले. परंतु नाचणीला बाजारपेठ नसल्याने शेतात तयार झालेल्या नाचणी पिकाचे करायचे काय? असा प्रश्न बचत गटाच्या महिलांसमोर होता. मात्र त्या वेळी लोटे औद्योगिक वसाहतीतील एक्सेल इंडस्ट्रीज आणि विवेकानंद रिसर्च ऍण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटने बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली. नाचणीसत्वापासून विविध पदार्थ तयार करण्याची संकल्पना घेऊन एक्सेलचे अधिकारी सुरेश पाटणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंबये बुरूमवाडी येथे नाचणीचे पौष्टिक सत्त्व तयार करण्याचे युनिट उभे केले. दापोली कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने बचत गटाच्या महिलांना नाचणीसत्वापासून बनवण्यात येणाऱ्या पदार्थांचे प्रशिक्षणही देण्यात आले.

महिलांनी नाचणीसत्वापासून तयार केलेले दिवाळीच्या फराळयाचे पदार्थ एक्सेल इंडस्ट्रिज या कंपनीच्या माध्यमातून थेट रोमला पाठविण्यात आले. कोकणच्या लाल मातीत पिकणारी नाचणी खऱ्या अर्थाने सातासुमुद्रापार गेली. नाचणीसत्वापासून तयार करण्यात आलेले वेगवेगळे फराळाचे पदार्थ रोम येथील इंटरनॅशनल फंड फॉर ऑग्रिकल्चर डेव्हलपमेंट या संस्थेला आवडले आणि पौष्टिक सत्व असलेल्या नाचणीचे पीक नेमके असते कसे? हे पाहण्यासाठी या संस्थेचे अधिकारी स्टिफन आणि जेनिफर थेट खेडला पोहोचले. एक्सेल इंडस्ट्रिजचे सुरेश पाटणकर यांच्या समवेत आंबये गावाला भेट देऊन त्यांनी नाचणीच्या शेताची पाहणी केली.

नाचणी पिकावर संशोधन करणार
स्टिफन आणि जेनिफर हे दोघेही आता नाचणी पिकावर संशोधन करणार असून नाचणी पिकाची माहिती ते आंतरराष्ट्रीय कृषी परिषदांमध्ये देणार आहेत. रोमच्या इंटरनॅशनल फंड फॉर ऑग्रिकल्चर डेव्हलपमेंट या संस्थेने नाचणी पिकाची दखल घेत नाचणी पिकाबरोबरच सामुदायिक शेतीची माहिती आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये देण्याचा निर्णय घेतला असल्याने कोकणच्या लाल मातीत पिकणारी नाचणी लवकरच आंतराराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे.