नदालचा ‘दस’ का दम

4

सामना ऑनलाईन । पॅरिस

स्पेनच्या राफेल नदालने आपणच लाल मातीतील बेताज बादशहा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. चतुर्थ मानांकित नदालने रविवारी झालेल्या किताबी लढतीत स्वित्झर्लंडच्या स्टेन वावरिंकाचा ६-२, ६-३, ६-१ असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवीत कारकीर्दीत दहाव्यांदा फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले.

चतुर्थ मानांकित नदालने तृतीय मानांकित वावरिंका पहिल्या सेटपासूनच डोके वर काढण्याची संधी दिली नाही. त्याने आपल्या ताकदवर फटक्यांनी वावरिंकाला कोर्टवर चांगलेच पळविले. २ तास ५ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या लढतीत नदालच्या आक्रमक खेळापुढे वावरिंका हतबल दिसला. पॅरिसमध्ये एकूण ८१ लढती खेळलेल्या नदालचा हा ७९ वा विजय ठरला. लाल मातीच्या कोर्टवर या स्पॅनिश खेळाडूने १३ वर्षांच्या कारकीर्दीत केवळ दोन वेळा पराभवाचे तोंड पाहिले. नदालचे कारकीर्दीतील हे १५ वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद ठरले.

राफेल नदालने २००५ मध्ये फ्रेंच ओपनच्या पहिल्या विजेतेपदाला मिठी मारली होती. त्यानंतर २००६, २००७, २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४ मध्ये नदालने फ्रेंच ओपनचे जेतेपद जिंकले. दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा जिंकून नदालने दहा वेळा एकाच स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्याचा पराक्रम केला. त्यामुळेच नदालला ‘क्ले कोर्टचा बादशहा’ म्हणतात.

आपली प्रतिक्रिया द्या