चटक मटक : नागपुरीचे डाळीचे वडे

साहित्य : 1 वाटी चणाडाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, पाव वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी मटकी, 3-4 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 इंच आले, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ.

फोडणीसाठी : 5 चमचे तेल, 7-8 लाल मिरच्या, 4 टहाळे कढीलिंब, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, तळण्यासाठी तेल.

कृती : सर्वप्रथम आदल्या रात्री डाळी व मटकी भिजत घालावी. सकाळी स्वच्छ धुऊन चाळणीवर निथळत ठेवावी. पाणी निथळल्यानंतर भरडसर वाटावी व एकत्र मिसळावी. आले व हिरवी मिरची एकत्र वाटावी. लहान कढल्यात किंवा पातेलीत तेल तापले की, त्यात लाल मिरच्या व कढीलिंबाची पाने चुरचुरीत होईपर्यंत परतावी. त्यात हिंग आणि हळद घालून खाली उतरवावे. फोडणी गार झाली की, मिरच्या-कढीलिंबाची पाने हाताने कुस्करून वाटलेल्या डाळीवर ही फोडणी घालावी. आले, मिरच्यांची गोळी, मीठ, अर्धा चमचा हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण हाताने कालवावे. त्याचा वडा थापावा. चटणी वा सॉसबरोबर खा.