तपासणी झालेली मतदान यंत्रे बदलण्याचा घातला घाट; कारण अस्पष्ट

1

सामना प्रतिनिधी। नगर

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेली व प्रात्यक्षिकांसह तपासणी पूर्ण झालेली मतदान यंत्रे ऐनवेळी बदलण्याचा घाट निवडणूक आयोगाने घातला आहे. बंगळुरूरहून आलेली मतदान यंत्रे परत पाठविण्याच्या सूचना देत हैदराबादहून तात्काळ नवीन मतदान यंत्रे घेऊन येण्याचे निर्देश आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिल्यामुळे प्रशासनाचीही धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान, लोकसभा निवणूक तोंडावर आलेली असतांना आणि सर्व मतदान यंत्रांची तपासणी झालेली असतांना अचानक मतदान यंत्रे बदलण्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

ऑगस्ट महिन्यात बेंगलोरहून जिल्हा प्रशासनाने नवीन मतदान यंत्रे आणली होती. मतदान यंत्रांची जोडणी करून सर्व राजकीय पक्षांसाठी मतदान यंत्रांची पाहणी करण्याचा कार्यक्रमही घेण्यात आला. मतदान यंत्रे कशा प्रकारे सुरक्षित आहेत, याचे प्रात्यक्षिक जिल्हाभरात दाखविण्यात आले. मतदान यंत्रांबाबत होत असलेल्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर नवीन मतदान यंत्राबाबत जनजागृती प्रशासनाकडून करण्यात आली होती. 8 हजार बीयू मशीन, 4 हजार 600 सीयु मशीन यासह 4 हजार 600 व्हीव्हीपॅट मशीन प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच आयोगाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या बैठकीत मतदान यंत्रे बदलण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने अचानकपणे हैदराबादहून नवीन मतदान यंत्रे घेऊन येण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला धाडले आहेत. 12 फेब्रुवारी पर्यंत नवीन मतदान यंत्रे घेऊन येण्यासाठी मुदत दिली असल्याने निवडणूक विभागाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मतदान यंत्रे आणण्यासाठी प्रशासनाने अधिकारी, पोलिस व वाहनांचा फौजफाटाही रवाना केल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हा निवडणूक विभागाकडे उपलब्ध असलेल्या मतदान यंत्रांची तपासणी होऊन निवडणुकीत वापरण्यासाठी सज्ज करण्यात आली होती. आता पुन्हा नव्याने मशीन येणार असल्याने प्रशासनाला सर्व सोपस्कार पुन्हा पार पाडावे लागणार आहेत. त्यातच मतदान यंत्रांबाबत देशभरात संशयाचे वातावरण असतांना कुठलेही कारण स्पष्ट न करता अचानक मतदान यंत्रे बदलण्याचा घाट घालण्यात आल्यामुळे संशयात भर पडण्याची चिन्हे आहेत.