अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची बत्ती गुल…नगरकरांचे उत्स्फुर्त आंदोलन

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

३९ डिग्री सेल्सियस तापमान वरून ८ तासाचं लोडशेडींग यामुळे नगरकर त्रस्त झाले आहेत. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आज नगरकरांनी वीज अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची वीज बंद केली आणि त्यांना केबिनमध्ये बसवून ठेवले. सणासुदीच्या काळात ठुमरीसाठी वीजपुरवठा होतो, मात्र मुलं अभ्यासाला बसतात तेव्हा लोडशेडींग सुरु होतं. हा काय प्रकार आहे असा प्रश्न विचारत शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.

भारनियमनामुळे पाणी पुरवठा योजनेवरही त्याचा परिणाम होऊ लागलाय. त्यामुळे मृगजळासारखी परिस्थिती नगरकरांपुढे निर्माण झाली आहे. कारण पाणी पुरेसं आहे मात्र पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा वीजपुरवठा भारनियमनामुळे खंडीत झाल्याने त्यांना ते मिळत नाही. महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी कोळश्याची कमतरता असल्याने भारनियमन सुरू असल्याचे सांगितले, मात्र हे उत्तर खोटं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे, त्यामुळे नगरकरांनी ‘या फेकू अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय’ अशा घोषणा दिल्या.