नगर लोकसभा मतदारसंघात अतिसंवेदनशील मतदार संघ नाही -जिल्हाधिकारी

4

सामना प्रतिनिधी । नगर

नगर लोकसभा निवडणूकीसाठी 23 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. प्रशासनाने निवडणूकीची सर्व तयारी पूर्ण केली असून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी नागरीकानी व मतदारांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले. दरम्यान, नगर लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेला अतिसंवेदनशील मतदार केंद्र नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक इशू सिंधू, निवडणुक विभागाचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील आदीसह अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले की, नगर जिल्हयातील 6 विधानसभा मतदार संघात 18 लाख 54 हजार 248 मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेणार आहेत. यात 9 लाख 70 हजार 631 पुरुष व 8 लाख 83 हजार 529 महिला मतदारांचा समावेश आहे. 8 हजार 932 अधिकारी, कर्मचारी या निवडणूकीसाठी कार्यरत असून त्यांचे आवश्यक प्रशिक्षण पूर्ण झाले आहेत. मतदारांनी मोठया संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी राहुल व्दिवेदी यांनी केले.

पुढे ते म्हणाले की, यावेळेला नगर लोकसभा मतदारसंघामध्ये एकही अतिसंवेदनशील अथवा संवेदनशील मतदान केंद्र नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अत्तापर्यत तिन केाटी 76 लाख रुपये पकडले असून यातील काही रक्कम तपास करुन परत देण्यात आले असल्याचे ते म्हणाले. निवडणूकीची घोषणा झाल्यापासून आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने नागरिकांच्या सुविधेसाठी व तक्रार निवारणासाठी विविध प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिले आहेत. याद्वारे जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त तक्रारीचा तात्काळ निपटारा करण्यात आला. नगर लोकसभा मतदार संघात एकूण 2 हजार 30 मतदान केंद्र आहेत. 2030 मतदान केंद्रावर मतदानासाठी आवश्यक त्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिव्यांग मतदारांसाठी वाहन व्यवस्था व मतदान केंद्रावर अस्थिव्यंग व वयोवृध्द मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. 152 मतदान केंद्रावर सुक्ष्म निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून 192 मतदान केंद्रावर वेबकास्टींग करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर 8 हजार 932 अधिकारी कर्मचारी व 198 क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती करणेत आली असून सर्वांना आवश्यक प्रशिक्षण, ईव्हीम प्रत्यक्ष हाताळणीबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मतदान केंद्रावर जाणेसाठी 646 वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. मतदार केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून 19 एप्रिलअखेर 12 हजार 157 टपाली मतपत्रिका निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना टपाली मतपत्रिकांचे वाटप करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी सांगितले.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला मतदारासाठी सखी मतदान केंद्र निश्‍चित करण्यात आले असून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात एकूण 10 सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. मतदारांना आपले मतदान केंद्राचा पत्ता कळावा यासाठी प्रत्येक मतदाराला फोटो वोटर स्लिपचे वाटप करण्यात आले आहे. 19 एप्रिलअखेर 14 लाख 12 हजार 829 मतदारांना फोटो वोटर स्लिपचे वाटप करण्यात आले तर 1409 अंध मतदारांना वोटर स्लिपचे वाटप करण्यात आले आहे, मतदारांना मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी व काही अडचण असल्यास त्यासाठी 1950 हा टोलफ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी सांगितले.

मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदान ओळखपत्र (ईपीक कार्ड) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी इतर 11 पर्यायी दस्तावेज ग्राहय धरण्यात येणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे, नागरिकांनी मतदान ओळखपत्र नसेल तर पासपोर्ट, वाहन चालक परवाना, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम ह्यांनी कर्मचा-यांना जारी केलेल्या फोटोसह ओळखपत्र, बँक,पोस्ट ऑफीसद्वारे जारी केलेल्या फोटोसह पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय)द्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) जॉब कार्ड, श्रम मंत्रालयाच्या योजनेंतंर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, फोटोसह पेन्शन दस्तावेज, खासदारांना/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि आधारकार्ड ही कागदपत्रे मतदानावेळी सोबत ठेवावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संपूर्ण तयारी करण्यात आली असून पूरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सखी मतदान केंद्रावर महिला पोलीस, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक ईशू सिंधू यांनी दिली.