नगरच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे अनिल बोरुडे

सामना प्रतिनिधी । नगर

शिवसेनेने आखलेली राजकीय खेळी यशस्वी ठरली असून शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने ऐनवेळी काढता पाय घेतला तर भाजपच्या एका गटाने शेवटपर्यंत शिवसेनेची साथ सोडली नाही. दरम्यान, शहराध्यक्ष दिलीप गांधी यांच्या गटाने मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे त्यांनी छिंदम याच्या वक्तव्याची पाठराखण केली असा आरोप शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केला.

भाजपचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. त्याच्या राजीनाम्यानंतर उपमहापौरपदाची निवडणूक आज झाली.नगर महापालिका स्थापन झाल्यापासून उपमहापौरपद हे दुसऱ्या पक्षाला मिळत होते, मात्र प्रथमच या निवडणुकीमध्ये महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे शिवसेनेकडे आली आहेत.