बाहेरगावच्या व्यक्तींकडून केडगावमध्ये दहशत

सामना प्रतिनिधी । नगर

नगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केडगाव उपनगरात बाहेरील गावांमधून आणि तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर व्यक्ती आलेल्या असून या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून केडगावमध्ये प्रचंड दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे करण्यात आली आहे.

यासंदर्भात प्रभाग क्र. 16 व 17 मधील शिवसेनेचे उमेदवार सुभाष कांबळे, दिलीप सातपुते, मोहिनी लोंढे, मनिषा कारखेले, सुनिता कोतकर, शांताबाई शिंदे, विजय पठारे, अमोल येवले यांच्यासह अपक्ष उमेदवार प्रतिक बारसे, आशा विधाते, गायत्री चोरडीया यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, महापालिकेच्या एप्रिलमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी दि. 5 एप्रिल व 6 एप्रिल रोजी केडगावमध्ये नगर, श्रीगोंदा, राहुरी व इतर तालुक्यांतील काही गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते प्रचारासाठी आणि मतदान केंद्राजवळ दहशत निर्माण करण्यासाठी आले होते. त्यानंतर निकालाच्या दिवशी सायंकाळी 2 शिवसैनिकांची हत्या झाली होती. या घटनेची दहशत आजही केडगावमध्ये कायम आहे.

या सार्वत्रिक निवडणुकीमध्येही केडगाव बाहेरील व्यक्ती या भागात येवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीत जे झाले त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीत होवू नये. यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने आजपर्यंत जशी यंत्रणा राबविली तशीच यंत्रणा मतदानाच्या अगोदरच्या दिवशी व मतदानाच्या दिवशी राबविण्यात यावी. केडगावमधील मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदान करता येईल याची काळजी घ्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.