जिल्हयातील 18 मतदान केंद्रावर महिला राज

VOTE

सामना प्रतिनिधी । नगर

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी प्रत्येक लोकसभा मतदार संघात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहेत. 37-अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर, श्रीगोंदा व कर्जत- जामखेड विधानसभा क्षेत्रात 10 मतदान केंद्रांवर तर 38-शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा विधानसभा क्षेत्रात 8 मतदान केंद्रांवर महिलाराज असणार आहे. या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचारी सांभाळणार आहेत. निवडणूक विषयक कामकाजासाठी महिला अधिकारी-कर्मचारी जबाबदारी पार पाडत असताना राजकीय पक्षांनीही याठिकाणी त्यांच्या उमेदवार प्रतिनिधी म्हणून महिलांची निवड करुन या अभिनव उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबध्दतेचा भाग म्हणून या लोकसभा निवडणूकीसाठी महिलांनी चालविलेले मतदान केंद्र असणार असून या केंद्राला ‘सखी मतदान केंद्र ‘असे म्हटले जाणार आहे. सखी मतदान केंद्र अधिकाधिक आकर्षक व सुंदर बनविण्यासाठी मतदान केंद्र परिसरात रांगोळी, सफाईवर विशेष भर देण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणूकीत दिव्यांग व महिला मतदारावर अधिक भर दिला आहे. त्यांना आकर्षित करण्यासाठी सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सखी मतदान केंद्र स्थापन करण्याचे आदेश असल्याने महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यास मदत होणार आहे. सखी मतदान केंद्रावर सर्व अधिकारी व कर्मचारी महिला राहतील. प्रत्येक मतदार संघातून एका मतदान केंद्राची सखी मतदार संघ म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्हयात 18 मतदार संघाचा समावेश करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी शेवगाव मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 133 – जिल्‍हा परिषद शाळा भगुर, राहुरी मतदार संघातील मतदान केंद्र क्र.50-नूतन मराठी शाळा नंबर 1 राहुरी बुद्रुक, पारनेर मतदार संघातील मतदान केंद्र क्र.184- पारनेर इंदिरा विकास भवन मेन हॉल, जुन्‍या तहसील ऑफीस जवळ पूर्व बाजू पारनेर, अहमदनगर मतदार संघातील मतदान केंद्र क्र.171- अ.ई.एस.डीएड कॉलेज सावेडी, मतदान केंद्र क्र.172 अ.ई.एस.डीएड कॉलेज सावेडी, मतदान केंद्र क्र.255 आयकॉन पब्लिक स्‍कुल चाहुराणा बु., मतदान केंद्र क्र.256 आयकॉन पब्लिक स्‍कुल चाहुराणा बु्. श्रीगोंदा मतदार संघातील मतदान केंद्र क्र.247 श्रीगोंदा माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक विद्यालय श्रीगोंदा शहर, कर्जत जामखेड मतदार संघातील मतदान केंद्र क्र.106 जामखेड ल.ना. हौशिंग विद्यालय जामखेड, मतदान केंद्र क्र. 194 जिल्‍हा परिषद शाळा, भांडेवाडी यांचा संभाव्य सखी मतदान केंद्रांत समावेश आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी अकोले विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 126 अकोले मराठी मुलींची शाळा अकोले, संगमनेर मतदार संघातील मतदान केंद्र क्र.155 पी. जे. आंबरे पाटील कन्‍या विद्यालय संगमनेर, शिर्डी मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 90 शारदा विद्या मंदिर राहाता, मतदान केंद्र क्र. 60 जिल्‍हा परिषद शाळा पिंपळवाडी, कोपरगाव मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 100 नवीन म. अ. कार्यालय कोपरगाव, मतदान केंद्र क्र. 128 डॉ. सी.एम. मेहता कन्‍या विद्या मंदिर कोपरगाव, श्रीरामपूर मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 115 डी.डी. काचोळे माध्‍यमिक विद्यालय श्रीरामपूर , नेवासा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 49 सुंदरबाई गांधी कन्‍या विद्यालय नेवासा खुर्द आदी केंद्राचा समावेश आहे.