शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश; नागोठणेकरांना मिळणार शुद्ध पाणी

सामना प्रतिनिधी । नागोठणे

गेल्या अनेक वर्षांपासून लटकलेल्या नागोठण्यातील शुद्ध पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे एका महिन्यात शहराला शुद्ध पाणी मिळणार आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या नागोठणे ग्रामपंचायतीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागले असून नागरिकांची धावपळ थांबणार आहे.

पेण, रोह्यानंतर नागोठणे शहराचे झपाट्य़ाने नागरीकरण वाढले आहे. येथे पाणीटंचाईची फारशी झळ बसत नसली तरी नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. मात्र आता नागोठणेकरांना लवकरच शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. गेली अनेक वर्षे लटकलेल्या येथील शुद्ध पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून त्याचा आढावा आज ग्रामपंचायत कार्यालयात शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सदस्य किशोर जैन व जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता महाजन यांच्या उपस्थित घेण्यात आला. याप्रसंगी उपअभियंता पाटील, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच शैलेंद्र देशपांडे, माजी सरपंच प्रणय डोके, शिवसेना नागोठणे उपविभागप्रमुख संजय महाडिक, सदस्य ज्ञानेश्वर साळुंके आदी उपस्थित होते.

सुरुवातीला स्टॅम्प पोस्ट उभारणार
सहा महिने ही शुद्ध पाणीपुरवठा योजना ठेकेदाराच्या व म. जि. प्र. च्या देखरेखीखाली चालविण्यात यावी, असे किशोर जैन यांनी सांगतानाच सुरुवातीच्या काळात ठिकठिकाणी सार्वजनिक स्टॅम्प पोस्ट उभे करून गावात शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ग्राहकांना घरात कनेक्शन द्यावेत अशा सूचना केल्या.