विद्यार्थ्यांना साधा भागाकार येत नाही मग दहावीचा निकाल ८० टक्के कसा लागतो?

शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांचा सवाल

नागपूर-
प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना साधा भागाकार करता येत नाही. मग हीच मुले दहावी बोर्डाच्या परीक्षा देतात आणि निकाल ८० टक्के लागतो. हे काय गौडबंगाल आहे. याचाच अर्थ बोर्डाच्या निकालात गडबड आहे, अशी टीका राज्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी करत केंद्रप्रमुखांपासून ते शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांची सोमवारी कानउघाडणी केली

नागपुरातील बी. आर. ए. मुंडले शाळेत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत झालेल्या शिक्षणाच्या कार्यशाळेत ते बोलत होते. नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यात सहभागी झाले होते. राज्यातील तिसऱ्या वर्गातील सुमारे ६० टक्के मुलांना वाचता येत नाही, भागाकार करू शकणाऱ्या प्राथमिक विद्यार्थ्यांचे प्रमाण महाराष्ट्रापेक्षा बिहारमध्ये जास्त आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांच्या तुलनेने निम्मा पगार घेऊन बिहारमध्ये शिक्षक दर्जेदार शिक्षण जर देऊ शकत असतील तर गलेलठ्ठ पगार असताना आपल्या राज्यातील शिक्षक हे का करू शकत नाही, असा सवाल नंदकुमार यांनी यावेळी उपस्थित केला. ‘असर’ संस्थेच्या अहवालातील निष्कर्षांवर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांचा कोणत्याही सरकारी अहवालावर नव्हे तर ‘असर’च्या अहवालावर विश्वास आहे, असे सांगुन ते पुढे म्हणाले की, त्या अहवालात देशात पहिल्या तीन राज्यांमध्ये येण्याचे लक्ष्य दिले आहे. ते पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी आपल्या शिक्षण पध्दतीत सुधारणा करणे गरजेचे आहे. ‘असर’च्या अहवालातून महाराष्ट्राला बदनाम केले जाते आणि तो अहवाल धादांत असत्य असल्याची टीका शिक्षकांकडून वारंवार केली जाते. मात्र, याचा कोणताही पुरावा दिला जात नाही, असेही ते म्हणाले.

नंदुरबार जिल्ह्यातील ८०० शिक्षकांना योग्य प्रकारे वाचता येत नाही. या ‌सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. मात्र त्यांचा कोणताही अवमान न करता त्यांना प्रशिक्षण देणे सुरू असून लवकरच त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल आणि त्यांचा शिक्षणाचा दर्जा सुधारेल, असा विश्वास नंदकुमार यांनी व्यक्त केला.