नागपुरातील काँगेस म्हणजे ‘भाजपची बी टीम’

सामना प्रतिनिधी । नागपूर

नागपूर शहर काँगेसमध्ये माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या आशीर्वादाने विद्यमान हंगामी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचा सुरू असलेला गोंधळ लक्षात घेता शहर काँगेसची विद्यमान हंगामी कार्यकारिणी बर्खास्त करून शहरातील कारभार नागपूर जिल्ह्याबाहेरच्या वरिष्ठ काँगेस नेत्याकडे सोपवा, अशी विनवणी नागपुरातील माजी खासदार आणि ज्येष्ठ काँगेस नेते गेव्ह आवारी यांनी काँगेसचे अखिल भारतीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांना एका पत्राद्वारे केली आहे. याच पत्रात विद्यमान हंगामी कार्यकारिणी ‘भाजपची बी टीम’ म्हणून काम करत असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला आहे. राहुलजींना पाठविलेले हे पत्र आज सोशल मिडियावर व्हायरल झालेले आहे.

विलास मुत्तेमवार हे १९८८ पर्यंत चिमूर मतदारसंघाचे खासदार होते. १९८८ मध्ये नागपुरात आल्यावर काही काळ गेल्यावर त्यांनी पक्षविरोधी कारवाया सुरू केल्या आणि हळूहळू पक्षाला अधोगतीला नेण्याचे काम केले असा आरोप आवारी यांनी या पत्रात केला आहे. मुत्तेमवारांच्या घाणेरड्या राजकारणामुळे २००७ मध्ये नागपूर महापालिका काँगेसच्या हातून गेली. २००९ मध्ये काही प्रस्थापित काँगेस आमदारांनाही पराभव स्विकारावा लागला. आणि २०१४ मध्ये तर शहरात खासदारही भाजपचा आणि सर्व आमदारही भाजपचेच, काँगेसला एकही जागा नाही अशी अवस्था आल्याकडे आवारींनी लक्ष वेधले आहे.

सध्या पक्षातील सर्व जुन्या दबंग कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना संपवण्याचे कट कारस्थान मुत्तेमवार आणि ठाकरे या जोडीने केले असून कोणतेही अधिकार नसताना ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी यांच्यावर खोटेनाटे आरोप लावून त्यांना पक्षातून काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही या पत्रात नमूद केले आहे. दुर्दैवाने प्रदेश नेतृत्त्व कोणताही हस्तक्षेप करत नसल्याने या जोडगळीचे फावले आहे आणि त्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप आवारींनी केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात आजवर या जातीयवादी शक्तींना वर डोके काढता आले नाही. मात्र ठाकरे, मुत्तेमवार यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे आज गडकरींसारखा भाजप नेता केंद्रात पोहोचला आहे आणि भाजपचाच असलेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीही नागपुरातूनच झाला आहे. हे सर्व ठाकरे, मुत्तेमवार यांच्या कटकारस्थानामुळे झाल्याचा आरोप करीत हे दोघेही भाजपची बी टीम म्हणून काम करत असल्याचा घणाघाती आरोप आवारी यांनी या पत्रात केला आहे.

हे पत्र सोशल मिडियावर आज व्हायरल झाल्यावर राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. विद्यमान स्थितीत चतुर्वेदींनंतर आता मुत्तेमवार आवारींचा तर नंबर लावणार नाही ना अशीही शंका राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.