नागपूर काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर

नागपूर – महापालिका निवडणुकीसाठी झालेल्या तिकिटांच्या वाटपावरुन काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगात आले आहे. शहर काँग्रेस अध्यक्षांचा पुतळा जाळणे, प्रतिकात्मक शवयात्रा काढणे असे प्रकार करुन नाराज झालेल्या काँग्रेसजनांनी संताप व्यक्त केला आहे.

उत्तर नागपूरमध्ये शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे आणि माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्याविरोधात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. नाराज झालेल्यांनी रविवारी संध्याकाळी विकास ठाकरे आणि विलास मुत्तेमवार यांचे पुतळे जाळून रोष व्यक्त केला. हिवरीनगर चौकात प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या पुतळ्याची प्रेतयात्रा काढून काहींनी मुंडन केले. या नाराजीचा फटका कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने लोकमंचसोबत आघाडी केली. या आघाडीनुसार प्रभाग क्रमांक नऊ मध्ये लोकमंचला तीन जागा देण्यात आल्या. यात लोकमंचचे ओबीसी पुरुष प्रवर्गातून विनिल चौरसिया यांना अधिकृतरीत्या काँग्रेसने एबी फॉर्म दिला. त्याचवेळी याच प्रवर्गातून किशोर जिचकार यांनाही एबी फॉर्म देण्यात आला. हा प्रकार समजल्यावर माजी महापौर आणि लोकमंचचे अध्यक्ष सरदार अटल बहादूरसिंग यांनी नाराजी व्यक्त केली. प्रभाग नऊ मध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून स्नेहा मिलिंद निकोसे, ओबीसी पुरुष प्रवर्गातून विनिल चौरसिया, महिला सर्वसाधारण प्रवर्गातून हेमांद्री थूल तर सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून स्वतः उमेदवार असल्याचे बब्बी बावा यांनी नमूद केले. विनिल चौरसियाच अधिकृत उमेदवार असल्याचे त्यांनी जोर देऊन सांगितले.