पतंजलीच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीला अटक

सामना प्रतिनिधी । नागपूर

बाबा रामदेव यांच्या पतंजली या कंपनीच्या उत्पदानाच्या वितरकाचे लायसन्स देतो असे सांगून लुबाडणाऱ्या टोळीला पोलिसांनी पाटणा येथून अटक केली आहे. पोलिसांनी या टोळीकडून तब्बल ११ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पिंटू उर्फ रवी कुमार, राकेश कुमार आणि सुशीलकुमार अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतंजली या कंपनीचे सामान विकण्याच्या एजन्सीचे लायसन्स देतो असे म्हणत १० लाख ५० हजार रुपये आमच्या खात्यात जमा करा असे आरोपींनी फिर्यादीला सांगितले. त्यानंतर फिर्यादीने आरोपींच्या खात्यात पैसे जमा केले. मात्र आरोपींनी आणखी १४ लाखांची मागणी केल्याने त्यांने पैसे भरण्यास नकार दिला आणि आधी दिलेले १० लाख ५० हजार परत मागितले. मात्र आरोपींनी त्यानंतर फिर्यादीसोबत कोणताही संपर्क साधला नाही.

फिर्यादीला आपली लुबाडणूक झाली असे समजले तेव्हा त्याने पोलीस स्थानकात लेखी तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी पाटणा येथए असल्याचे समजले तेव्हा तेथे एक पथक पाठवण्यात आले. त्यानंतर सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून ८ मोबाईल, २० हजार ५०० रुपये नगदी तसेच एक स्कोर्पियो असा ११ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.