प्रेमानंद गज्वींचा सवाल… कलावंतांनी ‘विचारस्वातंत्र्य सेना’ काढायची काय?

सामना प्रतिनिधी । नागपूर,(राम गणेश गडकरी नगरी)

कलाकृतीला प्रसंगी सरकार तर विरोध करते, पण हल्ली कोणीही उठतो आणि लेखक, कलावंतांना धमकी देतो, तोंडाला काळे फासले जाते. प्रसंगी ठार केले जाते, नाटय़गृहात बॉम्बस्फोट घडविले जातात, पण शिक्षा कुणालाही होत नाही, असे सांगतानाच या गुंडांच्या भीतीने उत्कृष्ट कलाकृती निर्माण करण्याचे सोडून आता संरक्षणासाठी लेखक-कलावंतांनी विचारस्वातंत्र्य सेना काढावी का? असे थेट सवाल 99व्या अ. भा. मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना केले.

99व्या अ. भा. मराठी नाटय़ संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांच्या हस्ते आज नागपुरात रेशीम बाग मैदानात उभारलेल्या राम गणेश गडकरी नगरीत पार पडले. त्यावेळी प्रेमानंद गज्वी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. महेश एलकुंचवार, मावळत्या शिलेदार कीर्ती शिलेदार, स्वागताध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर नंदा जिचकार, नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी मान्यवर उपस्थित होते.

मराठीच नव्हे तर भारतीय साहित्य स्वतःभोवती गोल गोल फिरते अशी टीका करीत शेक्सपियर, इब्सेन किंवा बेकर्थ हे नाटककार जगभर पोहोचले त्याप्रमाणे भारतीय नाटककार का पोहचू शकले नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दोन हजार वर्षांचा संपन्न वारसा असतानाही अश्वघोष भास, कालिदास, हर्षवर्धन भवभूती आणि अलीकडील काळातील, विनय मांजगावकर, रत्नाकर मतकरी यांची काही नाटके पोहोचली असतील, पण हे समग्र नाटककार पोहोचले नाहीत याबद्दल त्यांनी खंत गज्वी यांनी व्यक्त केली.

आम्हा सर्वांना नाटय़धर्मी होणे गरजेचे – प्रा. एलकुंचवार

आजचे रंगकर्मी हे नाटय़कर्मी आहेत; मात्र कलेला प्रतिष्ठा द्यायची असेल तर आम्हा सर्वांनाच नाटय़धर्मी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ मराठी नाटककार महेश एलकुंचवार यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलताना व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नाटय़धर्म म्हटल्यावर धर्माबद्दल मी बोललो म्हणून दचकून जाऊ नये, नाटय़धर्म म्हणजे एक जबाबदारी आहे. ती जबाबदारी स्वीकारून त्यासाठी जो त्याग करावा लागेल तो फक्त प्रसंगी लोकांचा विरोध पत्करून पुढे जाणे आणि हे करीत असताना परस्पराचा आदर बाळगून काम करणे हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, प्रा. महेश एलकुंचवार यांना अ. भा. मराठी नाटय़ संमेलनाच्या कार्यक्रमादरम्यान अचानक अस्वस्थ वाटायला लागले. त्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात संमेलन स्थळावरून नेण्यात आले.

दिल्लीत मराठी नाटक बघायला मिळत नाही – गडकरी

स्वागतपर भाषणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मराठी नाटक महाराष्ट्राचा अभिमान आहे. मी मराठी नाटकांचा शौकीन आहे, पण हल्ली दिल्लीत असल्यामुळे मराठी नाटक बघायला मिळत नाही. मराठी संस्कृती, नाटक हे वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. नाटक चळवळ लोकप्रिय व्हावी याकरिता नाटय़गृहांचे भाडे व वर्तमानपत्रांच्या जाहिरातीचे दर कमी करावेत, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.