विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, 2 दिवसांपूर्वी पुरस्कार मिळालेल्या ‘आदर्श शिक्षका’ला अटक

सामना प्रतिनिधी । नागपूर

गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील कोसंबतोडी आश्रमशाळेतील एका शिक्षकाने 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. सुनील कांबळे (45) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. विशेष म्हणजे या नराधम शिक्षकाला दोनच दिवसांआधी ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या शिक्षकाला अटक केली असून त्याचे 2 सहकारी फरार आहेत.

देवरी प्रकल्प अधिकारी कार्यालयाअंतर्गत, कोसंबतोंडी गावात बिरसा मुंडा आदिवासी अनुदानित आश्रमशाळा आहे. सध्या या शाळेचे इतर आदिवासी शाळेतील सांस्कृतिक खेळ सुरू आहेत. या संधीचा फायदा घेत नराधम शिक्षक सुनील कांबडे यांनी शाळेतील 2 सहकाऱ्यांच्या मदतीने शाळेत शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केले. या घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीने घडलेल्या प्रकराची तक्रार पालक आणि शाळेतील महिला वार्डनकडे केली.

पीडीतेच्या पालकांनी तात्काळ या घटनेची तक्रार पोलिसांत केली. तक्रारीनंतर पोलिसांनी नराधम शिक्षक सुनील कांबडे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीविरुद्घ चिंचगड पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार तसेच पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक कांबळे (32) व भोजराम मोहदेरे (25) हे दोघे आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.