महामार्ग केला, सोयीसुविधांची ‘समृद्धी कधी येणार?

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गाला दिलेय, याद राखा. महामार्ग केलात, पण त्यावर लोकांना सोयीसुविधांची ‘समृद्धी’ कधी येणार, असा संतप्त सवाल आज विधान परिषदेत शिवसेना आमदार ऍड. अनिल परब यांनी रस्त्याची दुरवस्था आणि वाढत्या अपघातांवरून सरकारला धारेवर धरले.

समृद्धी महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांबाबत विधान परिषदेमध्ये अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर झालेल्या चर्चेमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि आमदार अनिल परब यांनी भाग घेत समृद्धीवरील उणिवांचा पाढा वाचला.

समृद्धी महामार्गावर 11 डिसेंबर ते 31 ऑगस्ट 2023 या नऊ महिन्यांत 860 अपघात झाले आणि त्यात 112 लोकांचा मृत्यू झाला. गेल्या 14 ऑक्टोबरला एक ट्रक आणि टेम्पो ट्रव्हलरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला होता आणि 22 प्रवासी जखमी झाले होते. 17 प्रवाशांची मर्यादा असतानाच ट्रव्हलरमधून 34 प्रवाशांची वाहतूक करण्यात आली होती, असे चौकशीनंतर उघड झाले होते. सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी यावेळी उपस्थित प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले की, सदरहू अपघातानंतर वाहनांची तपासणी केल्यानंतर लक्षात आले की, टेम्पो ट्रव्हलरचा चेसिस नंबर बदलण्यात आला होता. 17 प्रवाशांचे पासिंग असताना 34 प्रवासी होते. ट्रकचालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समृद्धीवरून आतापर्यंत 60 लाख वाहनांनी प्रवास केला. त्यापैकी 73 वाहनांचे मोठे अपघात झाले.

लवकरात लवकर फूड मॉल्स, हॉटेल्स, पेट्रोल पंपाची व्यवस्था करा

अंबादास दानवे यांनी दादा भुसेंनी दिलेल्या उत्तरावर आक्षेप घेत वस्तुस्थिती मांडली. संबंधित टेम्पो ट्रव्हलरमध्ये लोखंडी बॅरिकेड्स लावून बसायची व्यवस्था केली होती. म्हणजेच ते वाहन तपासलेच गेले नाही, असे त्यांनी सांगितले.  ज्याने गाडीला धडक मारली त्याच्यावर गुन्हा बऱ्याच वेळानंतर दाखल झाला. समृद्धीवर वाहने उभी करण्यासाठी सोयच करण्यात न आल्याने ट्रकचालक वाट्टेल तिथे वाहने उभी करतात आणि त्यासाठी कितीही दंड भरायची त्यांची तयारी असते, असे दानवे म्हणाले. त्यामुळे लवकरात लवकर फूड मॉल्स, हॉटेल्स, पेट्रोल पंपाची व्यवस्था या महामार्गावर केली पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी मांडली. त्यावर येत्या एक दीड महिन्यात महामार्गावर सोयीसुविधा होतील, असे आश्वासन भुसे यांनी दिले.

टेंडरसाठी मारामाऱ्या सुरू आहेत

रस्ते अपघातात महाराष्ट्राचा वरचा नंबर आहे, असे सांगताना आमदार अनिल परब यांनी या अपघाताप्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना काहीही दोष नसताना निलंबित करण्यात आल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा दाखलाही त्यांनी दिला. केवळ कारवाई केल्याचे दाखवण्यासाठी त्यांचा बळी घेतला गेला, असा आरोपही त्यांनी केला.

एखादा महामार्ग होतो त्याचवेळी सर्व सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत, परंतु टेंडर कुणी उचलायचे यावर मारामाऱ्या सुरू आहेत आणि टेंडरची बोलणी करणारेच राजीनामा देऊन गेल्याने अजून किती दिवस टेंडरला लागणार माहीत नाही, असेही ते म्हणाले.