रणरणत्या उन्हात पाण्याचा दुष्काळ हटवण्यासाठी नागरिक एकवटले

2

सामना प्रतिनिधी । वलांडी

मराठवाड्यातील बालाघाट डोंगर रांगाच्या माळरानावरील देवणी तालुक्यातील नागराळ गाव गावाचा कायमस्वरूपी पाण्याचा दुष्काळ हटावण्यासाठी एकवटला आहे. रणरणत्या उन्हात सलग दुसऱ्या वर्षीही नागराळ वॉटरकप स्पर्धेत सहभागी होऊन गावातील अबाल वृद्धांसह गावातील जिल्हा परिषद शाळेतील १५ ते २० विद्यार्थ्यांची ‘तुफान सेना’ नावाची टिम परीश्रम करीत आहे.

देवणी तालुक्यात सलग दुसऱ्या वर्षी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे वेगाने सुरू आहेत. नागराळ ता. देवणी येथेही आगमुक्त शिवार, बायोडायनामीक खतनिर्मीती, शोषखड्डे, माती परीक्षण, बांधबदीस्ती वनविभागाच्या वतीने समतल चर खोदने या मधूनच गावातील पाण्याचा कायमस्वरूपी दुष्काळ हटावण्याचा गाव कसोशीने प्रयत्न करीत आहे.

सकाळी दहापासूनच ऊन्हाचा कडाका वाढत असल्याने पहाटे चार पासूनच गाव शिवारात जेष्ठ नागरीक, अबालवृद्ध पुरूषांसह विद्यार्थी श्रमदानात सहभागी झाले आहेत. एका जेसीबी यंत्राच्या सहाय्याने वन विभागाच्या वतीने गावालगत असलेल्या महाकाय डोंगरावर समतल चर खोदण्याचे काम श्रमदानासोबत चालू आहे. यासाठी बस्वराज पाटील नागराळकर, दिलीप पाटील यांच्या मित्रमंडळींच्या वतीने टिकाव खोरे खोदकामाचे साहित्य, इंधन पुरवठा केला जात आहे. दररोज महिलांसाठी सोडत पद्धतीने चिठ्ठी काढून साडी चोळी वाटपाचे काम उत्तेजनार्थ चालू असल्याने श्रमदानात उत्साह वाढत आहे.

तालुक्यात मागील वर्षी झालेल्या पाणी फाऊंडेशनच्या प्रेरणेने ग्रामस्थांनी आपलाही आदर्श निर्माण करण्यासाठी स्पर्धा पद्धतीने कामास गती दिली आहे. परीणामी तुफान सेना जेष्ठ नागरीक, आजी माजी लोकप्रतिनिधी पाण्याचे महत्व जाणून अहोरात्र श्रमदान करीत आहेत. या कार्यासाठी देवणीचे तहसिलदार घोळवे, माजी जि.प.सदस्य बालाजी कारभारी, दिलीप पाटील नागराळकर, उदगीरचे उद्योजक जयंत पाटील आदी नागरीक श्रमदानात सातत्याने हजर असून सोयी सुविधा पुरवीत असून गावात जलक्रांतीसाठी प्रयत्नशील आहेत.