बाप्पाला दाखवा गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य, वाचा फायदे

शमिका कुलकर्णी, आहारतज्ञ

गूळ-खोबरं…अगदी सहज मिळणाऱ्या गोष्टी. बाप्पाचा नैवेद्य यातूनच तयार होतो. गूळ-खोबऱ्याचे आरोग्यदायी फायदे.

बाप्पाच्या नैवेद्याचा आत्मा म्हणजे गूळ-खोबरं…बाप्पाचा आरोग्यदायी दृष्टिकोन आपल्याला ठायी ठायी दिसून येतो. गूळ आणि खोबरं महाआरोग्यदायी आहेत. पाहूया दोन्हीचे आरोग्याला उपयुक्त गुण…

गूळ व खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला दाखवण्याची पारंपरिक पद्धत असते. त्याचबरोबर मोदक व करंजी असे गोड पदार्थातही गूळ व खोबऱ्याचे सारण भरले जाते. हे गूळ व खोबरे पौष्टिक व अनेक गुणकारी घटकांनी भरलेले असते. गूळ-खोबऱ्यात असलेले गुणकारी घटक आपल्या शरीराला उपयुक्त असतात व निरोगी ठेवण्यात मदत करतात. इतर खव्याच्या गोड पदार्थांपेक्षा गूळ खोबऱ्याचे गोड पदार्थ पौष्टिक असतात. पचायला गुळाचे व खोबऱ्याचे अनेक फायदे आरोग्याला उपयुक्त असतात. अशा या गूळ खोबऱ्याचे अनेक फायदे आपल्या आरोग्याला कसे उपयुक्त असतात हे सविस्तर वर्णन केले आहे.

असे आहे महत्त्व

  • गूळ व खोबऱ्यातून तत्काळ ऊर्जा मिळते. थकवा, अशक्तपणा दूर होतो.
  • गुळात लोह असते म्हणून रक्त तयार होण्यास उपयुक्त असते.
  • गूळ-खोबऱ्यात पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यात मदत होते.
  • गूळ खाल्ल्याने शरीरातील विषाणू बाहेर काढण्यात मदत होते. यामुळे शरीर सशक्त राहाते.
  • नारळात शॉर्ट आणि मीडियम चेन फॅटी ऑसिडस् असल्यामुळे पचायला हलके असते.
  • गूळ पचनशक्ती वाढवण्यास मदत करतो.
  • गूळ-खोबऱ्यात अनेक जीवनसत्त्व असल्यामुळे अँटीऑक्सिडेंटस्चे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आरोग्य निरोगी राहते.
  • गूळ-खोबरे एकत्र खाल्ल्याने साखरेवर नियंत्रण ठेवण्यात मदत होते. खोबऱ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे गुळाचे रक्तात मिसळण्याचा वेग कमी होतो आणि रक्तातील साखर आटोक्यात राहते.
  • गूळ नियमित खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.

मोदक

साहित्य – १ वाटी तांदळाचे पीठ, १ वाटी गूळ, १ नारळ, दोन चमचे तूप, वेलची पूड.

कृती – जेवढे तांदळाचे पीठ आहे तेवढेच पाणी उकळत ठेवावे. पाण्यात मीठ, तेल घालावे. पाण्याला उकळी आली की पातेले खाली काढून त्यात लगेच तांदळाचे पीठ ठाकून मंद विस्तवावर वाफेवर ठेवावे. नंतर उकड गरम असतानाच ती एखाद्या भांडय़ाने मळावी.

नारळ खवून खोबरे व गूळ एकत्र करून शिजवावे. सारण शिजत आल्यास त्यात वेलची पूड घालावी.

तांदळाच्या उकडीच्या पिठाचे गोळे करून प्रत्येक गोळा लाटून त्यात सारण भरून त्याचे मोदक करावे. हे मोदक पात्रात घालून चांगली वाफ आणावी.