वॉटर ट्रेनचा ‘तुफानी’ कारनामा आता चौकशीच्या फेऱ्यात

सामना ऑनलाईन । मुंबई
नालासोपारा रेल्वे स्थानकातील रूळ बुधवारी (२० सप्टेंबर) मुसळधार पावसामुळे पाण्याखाली बुडाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून लोकल गाड्याही कमी वेगानं धावत होत्या. त्याचवेळी प्लॅटफॉर्म नंबर ४ वरून एक एक्स्प्रेस पाणी उडवत धडधडत गेली आणि प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.
पाणी कापत जाणाऱ्या या ट्रेनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जणू मोटरमननं ‘आज कुछ तुफानी करते है’ असंच मनाशी ठरवलं होतं, अशी शंका यावी इतक्या वेगानं ही ट्रेन धावली.
एक्स्प्रेस पाण्यातून इतक्या वेगात जाताना मोठा अपघात होण्याची शक्यता होती. सुदैवानं कोणतीही दुर्घटना तेथे घडली नाही. मात्र रेल्वे प्रशासनानं या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असंही आश्वासन रेल्वे प्रशासनानं दिलं आहे.