लेख : संत नामदेवांची गुरुबाणी

>>नामदेव सदावर्ते<<

संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या सहवासात उत्तर हिंदुस्थानातील तीर्थयात्रा केली होती. याप्रसंगी त्या दोघांचा जो सुसंवाद झाला, त्याचे वर्णन संत नामदेवांनी आपल्या तीर्थावळीया प्रकरणात अभंगबद्ध केले आहे. संत नामदेव उत्तरेकडे भागवत धर्माच्या प्रचारासाठी गेले. पंजाब प्रांतात त्यांचे वीस वर्षे वास्तव्य होते. शीख धर्मीयांच्या ग्रंथसाहिबया पवित्र धर्मग्रंथात संत नामदेवांची एकसष्ट हिंदी पदे समाविष्ट आहेत. ही सर्व पदे संत नामदेऊ जिंकी गुरुबाणीप्रसिद्ध आहेत

निवृत्ती, ज्ञानदेवादी भावंडांच्या संजीवन समाधीनंतर संतश्रेष्ठ नामदेव पुन्हा उत्तरेकडे भागवत धर्माच्या प्रचारासाठी गेले. पंचनदींचा परिसर अशा पंजाब प्रांतात नामदेवांचे सुमारे वीस वर्षे वास्तव्य होते. यासंबंधीची तपशीलवार सविस्तर माहिती गुरुमुखी वाणीत प्रसिद्ध झालेल्या भक्त पुरणदासकृत ‘जनमसाखी’त आहे. शीख धर्मीयांच्या ‘ग्रंथसाहिब’ या पवित्र धर्मग्रंथात संत नामदेवांच्या नावावरील एकसष्ट हिंदी पदे समाविष्ट करण्यात आली आहेत. ‘ग्रंथसाहिबा’त ही सर्व पदे ‘संत नामदेऊ जिंकी गुरुबाणी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. ती सर्व हिंदी पदे शीख बंधूंच्या नित्यपठणातही आहेत.

या सर्व हिंदी पदांची नामदेवरायांच्या अभंगांशी तुलना केली असता या दोन्ही रचनांमध्ये वैशिष्टय़पूर्ण वैचारिक साम्य आढळते. तसेच या हिंदी पदांमधून येणारे चरित्रविषयक उल्लेखही संतश्रेष्ठ नामदेवांच्या चरित्राशी जुळणारे आहेत. त्यांच्या हातचे नैवेद्याचे दूध श्रीविठ्ठलाने प्रत्यक्ष प्रकट होऊन प्यायल्याचा उल्लेख आहे. मंदिरात कीर्तन करण्यास विरोध झाला म्हणून त्यांनी देवळामागे कीर्तन केले तेव्हा मंदिर त्यांच्याकडे फिरले. ही घटनाही हिंदी पदांतून आढळते. नंतरच्या काळातील संत कबीरांच्या अनेक अभंगांतही नामदेवांच्या भक्तीचा उल्लेख आढळतो.

संत नामदेवांनी उत्तरआयुष्यात महाराष्ट्राबाहेर जाऊन पंजाबातील हिंदू धर्मीयांना मानवता धर्मपालनासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. रामनामस्मरणाच्या प्रचारासह सामान्य जनतेस जगण्याचे सामर्थ्य दिले. शीख धर्मीयांचा ग्रंथ ‘ग्रंथसाहिब’ हा पवित्र ग्रंथ सद्गुरू मानतात. संत नामदेवांचे ‘ग्रंथसाहिबा’तील हिंदी पदे आत्मज्ञान आणि नामभक्ती प्रकट करणारे आहेत. काही पदांमध्ये पुराणातील उल्लेख असून आत्मज्ञान सांगितले आहे. ही सर्व एकसष्ट पदे गुरुमुखी पंजाबी भाषेत असली तरी काही मराठी, हिंदी, गुजराथी, उर्दू, पारशी शब्द आढळतात. त्यातील विषय भगवत स्मरण, आत्मज्ञान हा आहे, पण बहुतेक पदांमध्ये पौराणिक कथा संदर्भ, व्यक्तीचा नामोल्लेखही आढळतात. रामायण, महाभारताप्रमाणे पुराणातील कथांचा उल्लेख आहे.

एकसष्ट गुरुमुखी पदांपैकी पहिले हिंदी पद असे आहे –

देवा पाहन तारिअले ।

राम कहत जन कस न तरे ।

तारिअले गनिका बिनुरूप कुबिजा

बिआध अजामलु तारिअले ।

चरण बधिक जन तेऊ सुकति भए ।

हऊ बलिबलि जिन राम कहै ।

दासीसुतजनु बिदरू सुदामा उग्रसेन

कऊ राज दिये ।

जपहीन, तपहीन, कुलहीन क्रमहीन ।

नामेके सुआमी तेऊ तरे ।।

या संपूर्ण गुरुमुखी पदात नामदेवांनी रामायण, महाभारत, पुराण यातील व्यक्तिरेखांचा उल्लेख केला आहे. या पदाचा अर्थ असा आहे – या देवरायांनी दगडांनाही पाण्यावर तरंगत ठेवले. मग रामनामाचा उच्चार करणारा मनुष्य या भवसागरातून तरून का जाणार नाही? गणिका, कुरूप अशी कुब्जा, व्याध, आजामीळ हेही प्रभूच्या कृपेने मुक्त झाले. सतत रामनामोच्चार करणाऱ्या भक्तावरून मी माझ्या शरीराची कुरवंडी करीन. दासीपुत्र विदूर, सुदामा यांना देवाने मुक्तिपद दिले आणि उग्रसेनाला राज्य दिले. रामनामोच्चार करणारा, मग तो जपतपहीन किंवा कुलशील, आचार, विचार हीन असो, त्याचाही उद्धार होतो.

‘गुरुबाणी’तील काही पदांतून आत्मज्ञान सांगितले असून काही ‘गुरुबाणी’ पदातून नामदेवराय तत्त्वज्ञान समजावून सांगतात. पुढील पदांत ते सांगतात, भगवान सर्वत्र एकच आहे, पण तो अनेक रूपांनी व्यापक आहे. मायाकृत अशा विविध दृश्य पदार्थांनी मोहित झालेल्या जिवांपैकी अगदी थोडय़ा लोकांना हा बोध प्राप्त होतो. मायारूप दृष्याच्या आकारातसुद्धा तोच गोविंद आहे. माळेत शेकडो मणी असले तरी त्यात दोरा एकच असतो. पाण्यात अनेक तरंग, लाटा, बुडबुडे उत्पन्न होतात, पण त्यातील पाणी एकच असते. तशी ही बहुविध सृष्टी ही भगवंताची लीला होय. भ्रमाने जे मायारूप मिथ्या पदार्थ दिसतात, त्यामध्ये एकच सत्य लपलेले असते. सर्व घटाघटांत तोच एक गोविंद आहे हा विचार मनात नित्य असू द्या.

पुढील एका ‘गुरुबाणी’ पदात नामदेवराय उपासनेविषयी अप्रतिम मार्गदर्शन करतात. देवाला पाण्याने स्नान घालावे तर पाण्यात अनेक सूक्ष्म जीव असतात. पाण्यातही श्रीविठ्ठल व्यापून राहिला आहे. देवाच्या गळ्यात ताज्या फुलांची माळ घालावी, तर भ्रमरांनी त्या फुलातील सुगंधी मकरंद प्रथमच सेवन केला आहे आणि भ्रमराच्या ठायीसुद्धा देव आहे. धारोष्ण दूध आणून त्याची खीर करावी आणि विठूरायाला नैवेद्य दाखवावा तर वासराने ते दूध उष्टे केलेले असते व वासराच्या रूपाने श्रीविठ्ठलच नटलेला आहे. तेव्हा नैवेद्य कसा, केव्हा व कोणता दाखवावा? या लोकी किंवा परलोकी काय, या संसारात विठ्ठलाशिवाय काहीच प्रतीत होत नाही. किंबहुना, विश्वात सर्वत्र जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी परमात्माच व्यापक आहे. संत नामदेव ‘गुरुबाणी’त म्हणतात –

आणिले दुध रिधाईले खीर ।

ठाकुर कऊ नैवेद्य करऊ ।

पहिले दूध बिटारिऊ बछरै । ईभै बिठलु उभै बिठलु, बिठले बिनु संसारू नहीं ।

स्थान थनंतरि नामा प्रणवै पुरी रहिऊ तू सरब मही ।

एका पदात ते आपण शिंपी जातीचे असल्याचा उल्लेख करतात. ते म्हणतात- माझे मन हे गज (कापड मोजण्याचे साधन) आहे व माझी जीभ ही कातर आहे. या साधनाच्या साह्याने मी यमाचे फास हळूहळू कापीत आहे. मी जिभेने रामनामाचा सतत जप करीत आहे. मला जातीपातीशी कर्तव्य नाही. मी जरी कपडय़ाला रंग देणे व कापड शिवणे हा धंदा करीत असलो तरी मी नामराम उच्चाराशिवाय एक क्षणही जिवंत राहणार नाही. मी भक्ती करीन व भगवंताचे अष्टौप्रहर गुणगान करीन.

सर्प आपल्या अंगावरील कात सहज दूर करील, पण आपल्या दातांतील विषाचा त्याग करीत नाही. बगळा हा पाण्यामध्ये एका पायावर उभा राहून ध्यानस्थ आहे असे भासवतो, पण त्याचे लक्ष पाण्यातील माशाकडे असते. जोपर्यंत आपले चित्त पवित्र झाले नाही तोपर्यंत असे बकध्यान करण्यात काय फायदा आहे? हिंसक अशा सिंहाप्रमाणे जो भोजन करीत आहे त्यांनी भक्ती व ब्रह्मज्ञानाच्या शब्दांची चर्चा का करावी? हे बहिर्मुख दगडांनो, मुखाने रामनामामृताच्या रसायनाचे प्राशन करा असे नामदेव म्हणतात.

गुरुमुखी लिपीतील व ‘ग्रंथसाहिबा’तील ही सारी संत नामदेवांची पदे आत्मज्ञान, हिंदू संस्कृतीची थोरवी व नामस्मरण प्रकट करते.