बदल सुखावणारा!

<<नमिता वारणकर>>

गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील राधिका सुभेदार… कॉर्पोरेट विश्वात प्रवेश करतेय… त्यासाठी तिच्या पेहरावात बदल होणार आहे… उद्योजिका होण्यासाठी पेहरावातल्या बदलाबरोबरच अंतर्गत बदल महत्त्वाचा आहे… याविषयी सांगतेय अभिनेत्री अनिता दाते…

कलाकारासाठी व्यक्तिरेखा बदलणं म्हणजे अंतर्बाह्य बदलणं असतं. आतापर्यंत प्रेक्षकांनी राधिका सुभेदारला एका पारंपरिक पेहरावतच पाहिलंय. नागपुरी भाषा बोलणारी, एक वेणी घालणारी, तिची एक स्वतंत्र जीवनशैली आहे. असं तिचं राहणीमान अतिशय साध्या पद्धतीचं असून त्यात कुठेही बडेजाव नाही. नवरा कितीही कमवणारा असला आणि कुठल्याही पदावर असला तरी त्याचा तिच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. घर, मूल आणि तिच्या आवडीनिवडी या पूर्वीपासूनच आहेत. ती त्या तशाच जपण्याचा अनेक वर्षे प्रयत्न करतेय, पण आता ती बदलू पाहतेय. कारण तिच्यावर आलेला प्रसंग. एखादी गोष्ट बदलणं अर्थात आपण सगळेच जण बदलत असतो. अनेक वर्षांनंतर  आपल्यामध्ये काही ना काही बदल होतच असतात. ते केवळ आपण स्वतः ठरवतो म्हणून होत नसतात. तर आपली परिस्थिती बदलते, आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती… आपण काय पाहतो, कुठे काम करतो, यामुळे सगळं बदलत असतं, तसंच राधिका सुभेदारच्या बाबतीत आहे… तिचा हा प्रवास ज्या ठिकाणी येऊन पोहोचला आहे ज्यामध्ये ती स्वतःची एक कंपनी सुरू करून उद्योजिका होऊ पाहतेय. एका कॉर्पोरेट विश्वात ती प्रवेश करतेय. राधिका बदलली पाहिजे असं वाटणारेही अनेक प्रेक्षक होते, असं अभिनेत्री अनिता दाते आपल्या बदललेल्या मेकओव्हरविषयी सांगते.

मेकओव्हरबाबत तिचं म्हणणं आहे की, यासाठी काही सकारात्मक बदलही राधिका स्वतःत करतेय. तिची भाषा बदलतेय, नागपुरी ठसका तसाच राहणार असला तरी व्यावसायिक जगतासाठी आवश्यक असणारी भाषा तिच्या तोंडी प्रेक्षकांना ऐकायला मिळेल. यासाठी काही सहकारी काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा एक भाग म्हणून ती कार्यालयात प्रेक्षकांना कॉर्पोरेट लूकमध्ये दिसेल.

प्रत्येक कलाकार दररोज पारंपरिक वेशातच वावरत असतो असे नाही. या सगळय़ा लूकबरोबर आता मी नेहमीच्या पेहरावात असल्यामुळे थोडे वाईटही वाटत आहे. तरीही राधिका कशी दिसेल यासाठी मालिकेतील सगळेच जण मेहनत घेत आहोत. रंग, केस, केसांचे टेक्श्चर, भाषा, पेहराव यावरही अभ्यास करतोय. म्हणजे तो मेकओव्हर सगळ्य़ांसाठी आहे. जेणेकरून राधिका सुभेदारला कसं सादर करता येईल, असं तिचं बदललेल्या वेशभूषेसाठी घेण्यात आलेल्या मेहनतीबाबत मत आहे.

राधिकाचा मेकओव्हर फक्त स्वतःसाठी 

राधिकाचा मेकओव्हर हा इतर कोणत्याही पात्रासाठी नाही. तो फक्त तिच्या स्वतःसाठी आहे. नवरा एका पाश्चिमात्त्य पेहरावातील मुलीच्या मागे लागतो यासाठी हा मेकओव्हर नाही. हा बदल तिच्या करीयरच्या अनुशंगाने झालेला आहे. तिचं स्वतःचं एक नवं व्यावसायिक जग ती निर्माण करतेय. त्यामुळे हा प्रवास सर्वार्थाने एका स्त्रीमध्ये घडलेल्या बदलांचा आहे. नवऱ्याने नाकारलेल्या बाईचा असल्यामुळे तिच्या जगात शनाया आणि गुरुनाथ येतच नाहीत, असे अनिता दाते सांगते.

 बदल आवश्यकच

उद्योजिका होण्यासाठी पेहरावात बदल होणं कितपत महत्त्वाचं आहे, यावर तिचं मत आहे की, वैयक्तिक आयुष्यात बदल आवश्यक असतो. आपण कसे आयुष्य जगतो त्यापेक्षा आपल्या व्यवसायासाठी कसे जगले पाहिजे हे प्रत्येकाने ओळखायला हवे. व्यवसायासाठी शिक्षण घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वात जो बदल होतो तो महत्त्वाचा असतो. ज्यासाठी जो पेहराव आवश्यक आहे तो परिधान करायला हवा. प्रत्येकीला पाश्चात्त्य पेहराव वापरणं आवश्यक नसून व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होणं महत्त्वाचं असतं.