‘मोदी अॅप’चा ५० लाख लोकांच्या खासगी माहितीवर दरोडा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

देशभरातील ५० लाख लोकांच्या वैयक्तिक माहितीवर भाजपच्या ‘मोदी ऍप’ने दरोडा टाकल्याचा धक्कादायक दावा एका फ्रेंच सिक्युरिटी रिसर्च फर्मच्या मालकाने केला आहे. मोबाईलवर ऍप डाऊनलोड केलेल्या लोकांचे ई-मेल, फोटो, नाव, लिंग यासारख्या अनेक खासगी गोष्टी wrkt.com या वेबसाइटसोबत शेअर झाल्याचे या फ्रेंच रिसर्चरचे म्हणणे आहे. यामुळे जनसामान्यांमध्येच नव्हे तर राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. इलियट ऍण्डरसन या फ्रेंच नागरिकाने ‘मोदी ऍप’ची चोरी उघडकीस आणतानाच अनेक गोष्टी प्रकाशात आणल्या आहेत. जेव्हा ऍप युजरचा डाटा थर्ड पार्टीबरोबर शेअर केला जातो तेव्हा त्यापूर्वी ऍप युजरची परवानगी घेणे गरजेचे असते. मोदी ऍप मात्र तशी कोणतीच परवानगी घेत नाही.

ऍण्डरसन ट्विटरवर; भाजपची पळापळ

  • इलियट ऍण्डरसन याने ट्विटरवर मोदी ऍपला टॅग करून ही सारी माहिती अपलोड केली. त्यानंतर भाजपच्या ऍप टीमने त्यांच्याशी संपर्क साधला तो असा…
  • ऍप टीम – तुम्ही डाटा सिक्युरिटीविषयी चिंता व्यक्त केली आहे. मात्र डाटा पूर्णपणे सुरक्षित असून चिंता करण्याचे काहीच कारण नाही.
  • इलियट – मोबाईलधारकाच्या परवानगीशिवाय हा डाटा कसा गोळा केला जाऊ शकतो, हा माझा प्रश्न आहे. कोणाहीसोबत डाटा शेअर करणे चुकीचे आहे. डाटा सिक्युरिटी ही गोष्टच वेगळी आहे. युरोपियन कायद्यानुसार असा डाटा शेअर करणे चुकीचे आहे. जीडीपीआर कायदाही तेच सांगतो. हे तुम्हाला ठावूक नाही का?
  • ऍप टीम – जीडीपीआर कायद्याचा अभ्यास करून आम्ही तुमच्याशी पुन्हा संपर्क करू.

काँग्रेस आक्रमक

या डाटा चोरी प्रकरणावरून काँग्रेसने भाजपला घेरले आहे. मोदी ऍपवर प्रोफाइल बनवणाऱयांची खासगी माहिती ‘क्लेव्हर टॅप’ या अमेरिकन कंपनीला पाठवली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर ‘डिलीट नमो ऍप’ ही मोहीमही सुरू करण्यात आली आहे.

हाय! माझे नाव नरेंद्र मोदी आहे. मी हिंदुस्थानचा पंतप्रधान आहे. जेव्हा तुम्ही माझ्या अधिकृत ऍपवर साइन अप करता तेव्हा मी तुमचा सर्व डाटा अमेरिकन कंपन्यांना, माझ्या मित्रांना देतो- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष (ट्विटरवर)

मोदी ऍप ऍण्ड्रॉइड फ्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून गुगल स्टोअरवरील अपडेटनुसार आतापर्यंत ५० लाख लोकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे.

इलियट यांच्या ट्विटनंतर रातोरात हालचाली झाल्या. काय घडले नेमके?

आधी – ऍप वापरण्यासाठी मोबाईलवरील एसएमएस, फोटो, व्हिडीओ आणि इतर डाटा शेअर करण्याची परवानगी द्यावीच लागत होती. जर त्यासाठी नकार दिला तर मोबाईलधारकाला ऍप वापरता येत नव्हते.

आता – शनिवारी मोदी ऍपचे सेटिंगच बदलण्यात आले. आता जर कुणाला आपला डाटा द्यायचा नसेल तरी काही हरकत नाही. तो गेस्ट युजर म्हणून ऍप वापरू शकतो.

भाजपचा इन्कार

भाजपच्या आयटी विभागाने मात्र मोदी ऍपच्या घोळाचा इन्कार केला आहे. मोदी ऍप कुणाच्याही कुठल्याही डाटाचा वापर करीत नाही. युजर डाटा शेअरला मान्यता न देताही ऍपचा वापर करू शकतो असे विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले आहे.