कॅन्सरग्रस्तांकरिता मायेची ऊब

>> प्रज्ञा घोगळे 
देश-विदेशातून येणाऱया कॅन्सरग्रस्तांकरिता परळ येथील नाना पालकर स्मृती समितीकडून मायेची ऊब मिळत आहे. या समितीत परदेशातून येणारे कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकरिता ही समिती आधार बनली आहे. गोरगरीब आणि कॅन्सरने त्रस्त असणाऱया व कुठेही आधार नसलेल्या व्यक्तींना नाना पालकर समिती मायेची सावली देत आहे.

नाना पालकर समिती १९६८ साली स्थापन झाली. या समितीला तब्बल ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरुवातीच्या काळात महापालिकेकडून एका छोटय़ा जागेत देणगीदारांच्या मदतीने १९९७ साली रुग्णसेवा सदन ही इमारत उभारण्यात आली व त्यानंतर २००४ साली त्यावर आणखी तीन मजले बांधण्यात आले असून ही इमारत दहा मजल्यांची आहे. या रुग्ण सदनात एकूण ३८ खोल्या असून प्रत्येक खोलीमध्ये दोन रुग्ण व नातेवाईक असे एकूण २२५ लोक राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या खोलीतील टॉयलेट, बाथरूम व खोली स्वच्छ असून खोली टापटीप ठेवण्याचे काम खोलीत राहणाऱया व्यक्तीच करतात. त्याचप्रमाणे या रुग्णांच्या मनःशांतीकरता गणपतीची आरती, भजनदेखील केले जाते. सरकारची कुठलीही मदत नसताना दानशूरांच्या देणग्यांवर या समितीचा डोलारा चालतो. या समितीत रुग्णांकरिता विनाशुल्क निवास, १० रुपयांत जेवण, ५ रुपयांत नाश्ता दिला जातो. केईएम, वाडिया, टाटा या ठिकाणी येणारे देश-विदेशातील रुग्ण या समितीचा आधार घेतात. या ठिकाणी रुग्ण वेटिंग लिस्टवर असतात. मुंबईबाहेर राहणाऱया रुग्णांकरिता ही सेवा देण्यात येते. त्याकरिता वशिल्याची गरज नसून ज्या रुग्णालयात उपचार चालू असतात त्या रुग्णालयाचे केसपेपर दाखवल्यास सहजरीत्या प्रवेश मिळतो.
वाडिया रुग्णालयात ५० मातांना पोळी-भाजी देण्यात येते, तर शिवडी येथील टीबी रुग्णालयातील ८०० रुग्णांना फळवाटप केले जाते व केईएम रुग्णालयातील १५० नातेवाईकांना दररोज पोळी-भाजी दिली जाते. मुंबईबाहेरील कोणी कॅन्सररुग्ण असल्यास त्यांनी क्षणाचा ही विलंब न लावता नाना पालकर स्मृती समितीशी संपर्क साधावा. त्यांचा पत्ता – रुग्णसेवा सदन मार्ग, परळ, दूरध्वनी क्र. २४१६४८९०, २४१७२१६७
– कृष्णा महाडिक, व्यवस्थापक