नाना पटोले माझे मित्र, त्यांनी भाजप सोडली म्हणून आशीर्वाद संपत नाहीत, त्यांना माझ्या शुभेच्छा – नितीन गडकरी

नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात थेट लढत.

सामना प्रतिनिधी । नागपूर

मी राजकारणात कधीही दुश्मनी ठेवली नाही, ठेवत नाही. नाना पटोले माझे मित्र आहेत. त्यांनी भाजप सोडली म्हणून आशीर्वाद संपत नाहीत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी ते म्हणाले की, “नागपूरमध्ये पाच वर्ष काम करताना कधी जाती, पंथ, याचा विचार केला नाही. कोणाला कमी लेखले नाही, केवळ नागपूरचा विकास व्हावा हेच माझे ध्येय होते. नागपूरच्या विकासासाठी पाच वर्षात जे काम केलं, त्याच्या आधारावर लोकांसमोर जाऊन मत मागेन, मला विश्वास आहे की, नागपुरातील जनता माझ्या कामाची पावती मतदानाच्या माध्यमातून देईल, असंही गडकरी यांनी सांगितले.

नाना पटोले यांच्या बाबत पत्रकारांनी विचारले असता नितीन गडकरी म्हणाले की, सगळ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, मग कोणीही उमेदवार असेल. मी कोणावरही वैयक्तिक टीका-टिप्पणी करणार नाही. काँग्रेसला आपला उमेदवार ठरवण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे. जो उमेदवार असेल त्याने लढावं. मी जे पाच वर्षात काम केलं, त्याच्याच आधारावर लोकांसमोर जाऊन त्यांचा आशीर्वाद मागेन. नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून आशीर्वाद संपत नाही. मी राजकारणात अशाप्रकारची दुश्मनी ठेवली नाही, ठेवतही नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मी गेल्या पाच वर्षात जी विकासाची कामे केली त्या भरवंशावर आपण मतदारांपुढे जाऊ ,असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या निवडणूकीत जी मते घेतली होती त्यापेक्षा जास्त मते घेवून निवडून येईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.