Lok sabha 2019 पटोले तुम्ही लढा, माझा तुम्हाला आशीर्वाद! गडकरींच्या शुभेच्छा

सामना ऑनलाईन । नागपूर

नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून माझा आशीर्वाद संपला, असे नाही. ते तरुण आहेत, त्यांनीही लढले पाहिजे. माझा आशीर्वाद त्यांना आहे,अशा शब्दात केंद्रीय मंत्री आणि जेष्ठ भाजप नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर नागपूर मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या पटोले यांना दिल्या.

Lok sabha 2019 नागपुरात नितीन गडकरींविरुद्ध नाना पटोले सामना रंगणार

नाना पटोले हे एकेकाळी नितीन गडकरी यांचे घनिष्ठ सहकारी होते. मधल्या काळात भाजप नेतृत्वासोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने आता त्यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून थेट नितीन गडकरी यांच्याविरोधातच उमेदवारी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना गडकरी यांनी पटोले यांना शुभेच्छा दिल्या. ते पूर्वीही माझे मित्र होते आणि आताही माझे मित्र आहेत, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

काँग्रेसला निवडणुकीत त्यांचा उमेदवार उभा करण्याचा पूर्ण अधिकार आहे.त्यांनी नाना पटोले यांना नागपूरमधून उमेदवारी दिलीय.माझ्या शुभेच्छा त्यांना आहेत. मी जात, पात, धर्म न पहाता विकासाचे काम केले आहे. त्यामुळे मतदार राजा मला पुन्हा मोठे यश देईल असा मला विश्वास आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.