सरकारवर गुन्हा दाखल करा, भाजप खासदाराची मागणी

सामना प्रतिनिधी । नागपूर

राज्यातील मच्छिमारांना वेठबिगार करणारा जीआर सरकारने काढला आहे. सरकारने मच्छिमारांसोबत ‘चिटिंग’ केली आहे. अशा सरकारवर थेट गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाजप खासदार नाना पटोले यांनी केली. यापूर्वीही पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशाप्रकारे तोफ डागली होती. मच्छिमार समाजाचे अधिवेशनात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

राज्य शासनाने मच्छिमारीसाठी तलाव ठेक्याने देणे व अन्य विषयासंदर्भात ३० जून २०७ रोजी निर्णय जाहीर केला. हा निर्णय मच्छिमारांना वेठबिगार बनविणारा आहे. राज्यातल्या ७८ मतदारसंघात मच्छिमारांची ताकद आहे, मात्र एकी नसल्यामुळे राजकीय व्यवस्थेत त्यांचा प्रभाव नाही. शासनाचा जीआर हा उद्योगपतींना लाभ पोहोचविणारा असून पारंपारिक मासेमारांसाठी मारक आहे एकीकडे शासन रोजगारनिर्मितीसाठी कौशल्य विकासाच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च करते, तर दुसरीकडे मच्छिमारांचा रोजगार हिरावून घेत आहे ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली त्या ऐतिहासिक कर्जमाफीची आम्ही वाट पाहत आहोत, असे पटोले म्हणाले.

मच्छिमारांसाठी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू राज्यभरात त्यासाठी मेळावे घेतले जातील सरकारने मासेमारांना उध्वस्त करून नये तसेच मला इतिहासाची पुनरावृत्ती करायला भाग पाडू नये, असा इशाराच पटोले यांनी दिला.