भाजपातील नाराजांचे १५ नोव्हेंबरला संमेलन

सामना ऑनलाईन । नागपूर

भाजप खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपविरोधातच दंड थोपटले असून येत्या ८ नोव्हेंबर रोजी बुलडाणा जिह्यातील चिखली येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची एका कार्यक्रमात भेट घेणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी नागपुरात भाजपमधील असंतुष्ट नेत्यांचीही भेट घेतली आहे. १५ नोव्हेंबरला भाजपमधल्या सर्व नाराज नेत्यांची मोट बांधून पुण्यात संमेलन घेणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

१० दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र मोदींना लिहिले होते, पण त्यानंतरही कोणताही प्रतिसाद न आल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले आहे. नोटाबंदी आणि जीएसटीवरून भाजप खासदार नाना पटोले यांनी त्यांच्याच पक्षाला पुन्हा एकदा फैलावर घेतले. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापाऱयाचे कंबरडे मोडले आहे. तर शेतकरीही अडचणीत आहेत. त्यामुळे व्यापारी, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी वेगळी चळवळ उभी करण्याचं नाना पटोले यांनी दसऱयाच्या दिवशी बोलताना जाहीर केले होते. नुकतेच नाना पटोले यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांची नागपूर विमानतळावर भेट घेऊन चर्चा केली असल्याचे सांगितले.

यापूर्वीही नाना पटोलेंचा भाजपला घरचा आहेर
नाना पटोले यांनी शेतकरी कर्जमाफीवरून सरकारवर हल्लाबोल केला होता. राज्य सरकारने सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस पावले उचलावी अन्यथा आपण इतिहासाची पुनरावृत्ती करू शकतो, असे म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचे संकेत दिले. पटोले यांनी २००९ मध्ये काँग्रेसमध्ये असताना कर्जमाफीच्या मुद्यावर स्वपक्षीयांवर हल्लाबोल करत आमदारकीचा राजीनामा दिला होता.