लेख : तीन वेळा अंतराळात


[email protected] 

अंतराळ रात्रींच्या जीवनात प्रत्यक्ष अंतराळयात्रेला जेवढं महत्त्व असतं तेवढंच अंतराळ-संशोधन केंद्रात वैज्ञानिक म्हणून काम करण्याला असतं. प्रत्येक अंतराळयात्रीचं कठोर प्रशिक्षण अंतराळ कार्यक्रम केंद्रात होतं. अंतराळात जाऊन काही प्रयोग करणं साहसी आणि कौशल्याचं असलं तरी पृथ्वीवरच्या अंतराळ-केंद्रातून अंतराळ मोहिमांचं नियोजन, निरीक्षण आणि तिथे काही अडचण आल्यास त्वरित योग्य तो निर्णय घेऊन संकटाचं निराकरण करणं या गोष्टीही फार महत्त्वाच्या असतात.

अनेक अंतराळयात्रींना त्यांच्या कारकीर्दीत अशी दोन्ही कामे करण्याची संधी मिळते, किंबहुना अशी कर्तव्ये पार पाडावीच लागतात. नॅन्सी जॅन डेव्हिस या अमेरिकन महिला अंतराळयात्रीचं कार्य अशाच प्रकारचं दुहेरी होतं. अंतराळात तीनवेळा जाण्याची संधी मिळालेल्या नॅन्सीबाईंनी नंतर अंतराळ कार्यक्रमासाठी पृथ्वीवरच्या संशोधन केंद्रातून मोठं योगदान दिलं.

अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात जन्म झालेल्या नॅन्सी यांचं गाव मात्र अलाबामा राज्यात होतं. याच राज्यातील हण्टस्व्हिल येथील शाळेत त्यांचं शिक्षण झालं. नंतर जॉर्जिया विद्यापीठातून जीवशास्त्र्ाात पदवी घेतल्यावर त्यांनी मेकॅनिक इंजिनीअरिंगचीही पदवी ऑर्बन  विद्यापीठातून प्राप्त केली. अमेरिकन शिक्षण पद्धतीत असं वेगवेगळ्या विषयांचं शिक्षण आवडीनुसार सहजतेनं घेता येतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर नॅन्सी टेक्सास राज्यातील एका पेट्रोलियम कंपनीत इंजिनीअर म्हणून काम करू लागल्या. तिथे असतानाच त्यांना ‘नासा’च्या मार्शल स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये एअरोस्पेस इंजिनीअर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तिथल्या ‘स्ट्रक्चरल ऍनॅलिसिस डिव्हिजन’मध्ये म्हणजे अंतराळयानाच्या बांधणीची देखरेख आणि विश्लेषण करण्याचा विभागात त्यांचं काम सुरू झालं. त्यावेळी या विभागाकडे ‘हबल स्पेस टेलिस्कोप’ची तपासणी करण्याचं काम होतं, जी अवकाश-दुर्बिण आज पाव शतकानंतरही अवकाशातला ‘तिसरा डोळा’ बनून पृथ्वीवर विराट विश्वाचे फोटो पाठवत आहे.

याचबरोबर नॅन्सी यांची नेमणूक रॉकेटच्या बूस्टरच्या आराखडय़ात (डिझाइन) सुधारणा करण्याच्या कामावर झाली. त्यात त्यांनी आपली बौद्धिक चमक दाखवली व एका संशोधनाचं पेटंटही त्यांना मिळालं. मात्र त्याचं वर्णन फारच तांत्रिक होईल.

‘नासा’साठी अशी विविधलक्षी कामगिरी बजावत असतानाच नॅन्सी यांना १९८७ मध्ये अंतराळयात्री होण्याची संधी मिळाली. या काळातील सात अंतराळयात्रांच्या अंतराळवीरांशी संवाद साधण्याचं काम त्यांनी पार पाडलं. पहिल्या अंतराळवारीनंतर नॅन्सी डेव्हिस यांनी अंतराळयात्रींचं प्रशिक्षण, उपग्रहातील सामग्री (पे-लोड) यासंदर्भातील जबाबदारी उचलली. नॅन्सी यांना १९९२ मध्ये मिशन स्पेशॅलिस्ट म्हणून पहिल्यांदा अंतराळात जाण्याची संधी मिळाली. नंतर १९९४ आणि १९९७ मध्येही त्या अंतराळातील कामगिरी यशस्वीरीत्या बजावून परतल्या. स्पेस शटलचं पन्नासावं उड्डाण हा अमेरिका आणि जपान संयुक्त प्रकल्प होता. यावेळी दोन्ही देशांच्या अंतराळयात्रींनी ४३ वैज्ञानिक प्रयोग केले. त्यावेळी नॅन्सी यांचे प्रथम पती मार्क ली हे पे-लोड कमांडर होते. अंतराळात जाणारं हे पहिलंच दांपत्य असावं. नॅन्सी यांनी तीन अंतराळ मोहिमांमध्ये एकूण २८ दिवस अंतराळात व्यतीत केले.

१९९९ मध्ये नॅन्सी यांची नेमणूक ‘मार्शल स्पेस फ्लाइट सेंटर’मध्ये डायरेक्टर म्हणून झाली. तिथेही त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. २००५ मध्ये त्या ‘नासा’मधून निवृत्त झाल्या.