संसंदेत सलग ८ तास भाषण देत मोडला १०८ वर्षाचा विक्रम

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पार्टीच्या खासदार नॅन्सी पेलोसी यांनी संसदेत सलग ८ तास ७ मिनिट भाषण करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांचं भाषण संपलं, त्यावेळी त्यांनी १०८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. त्यांच्या या यशानंतर संपूर्ण संसदेत टाळ्यांचा कडकडाट झाला. विशेष म्हणजे नॅन्सी यांनी ७८ वर्षी हे करून दाखवलं आहे. कॅलिफोर्नियाच्या डेमोक्रेट खासदार नॅन्सी यांनी सकाळी १०.०४ मिनिटांनी भाषण देण्यास सुरूवात केली. अमेरिकेच्या मीडिया रिपोर्टनुसार त्यांनी ६ वाजून ११ मिनिटांनी त्यांचं भाषण संपवलं.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाषण करताना संपूर्ण वेळ त्या उभ्या होत्या. भाषणादरम्यान त्या फक्त पाणी प्यायल्या. ज्यावेळी त्यांनी भाषण समाप्त केलं त्यावेळी आपण १०८ वर्षापूर्वीच्या विक्रम मोडत इतिहास रचल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं. याआधी १९०९मध्ये अमेरिकेच्या संसदेत सर्वात जास्तवेळ भाषणाची नोंद आहे. चॅम्प क्लार्क यांनी सलग ५ तास १५ मिनिट भाषण देत विक्रम केला होता. भाषणात त्यांनी अमेरिकेतील अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपली मते मांडली.

नॅन्सी यांना संसदेच्या एका कर्मचाऱ्यानं माहिती दिली की, तुम्ही सर्वात लांबलचक भाषण देत विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यावेळी त्यांनी ही माहिती सर्वांना सांगितली. तसेच मी या विक्रमामुळे आश्चर्यचकीत झाले आहे, असंही त्या म्हणाल्या.