केळीला बंदुकीचा रोग लागल्याने शेतकरी हवालदिल

सामना प्रतिनिधी। नांदेड

नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे केळी पिकांवर बंदुकी नावाचा रोग जडला आहे. यामुळे केळ्याचे अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल असलेले दर आता सहाशेवर पोहचले आहेत. यामुळे केळी उत्पादक त्रस्त असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याने केळीची लागवड करणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर परिसरात मोठ्या प्रमाणात केळीचे नगदी पीक म्हणून बागायतदार शेतकरी घेतात. ही केळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाते. मुंबईपर्यंत ही केळी पोहचते. त्यासाठी राज्यभरातून व्यापारी या परिसरात केळी खरेदीसाठी येतात. मात्र गतवर्षीच्या पाण्याच्या दुष्काळा बरोबरच यावर्षी केळीच्या भावात खूपच तफावत निर्माण झाली असून, सुरुवातीच्या १२०० रुपये क्विंटलच्या भावावरून रास केळी ६०० रुपये तर बेरास केळी ३०० रुपये प्रति क्विंटलवर आली आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या ओझ्याखाली गेला आहे.

मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेती सिंचनासहित पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी कोसोदूर जावे लागत होते. इसापूर धरणातही अल्प पाणी साठा असल्याने या भागाकरिता दोनच वेळ पाणी पाळी सोडण्यात आले होते. यामुळे विहिर व बोअरचे पाणी कमी झाले तर काही विहिरी कोरड्या पडल्याने अनेक शेतकऱ्यांच्या केळीचे पीक वाळून गेले. काहींनी पाणी उपलब्ध नसल्यामुळे केळी कापून टाकावी लागली. पण या संकटातूनही काही शेतकऱ्यांनी विहिरीचे खोदकाम करून पाणी मिळवले. काहींनी तर टँकरने पाणी आणून केळीची जोपासना केली. एवढ्या संकटातून शेतकऱ्यांनी वाचविलेल्या केळीला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. गत वर्षी केळीला १८०० ते २००० रुपये प्रति क्विंटल भाव होता. अन यंदाची सुरुवात १२०० रुपये प्रति क्विंटलने केळीची खरेदी झाली. मात्र गेल्या एक महिन्यापासून केळीची खरेदी चांगला माल म्हणून ६०० रुपये व बेरास केळीला केवळ ३०० रु प्रति क्विंटल अशा कवडीमोल भावाने व्यापारी खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघणार नसल्यामुळे चिंता वाढली आहे.