मोटारी लावून पाणी खेचणाऱ्यावर गु्न्हे दाखल करणार, नांदेडच्या आयुक्तांचा इशारा

7

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेड शहरात पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना दमदाटी करणाऱ्या मंडळींचा चोख बंदोबस्त करण्यात येईल तसेच सिध्देश्वरचे पाणी नांदेडला उद्या पोहंचणार असून, या मार्गावर मोटारी लावून पाणी खेचून घेणाऱ्या मंडळींवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा सज्जड इशारा आयुक्त लहुराज माळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

नांदेड शहरात पाण्याची परिस्थिती गंभीर झाली असून, जलसंपदा विभागाने यावर्षी विष्णूपुरीतून दरवर्षी 30 दलघमी पाणी मिळायचे, मात्र त्यांनी 28 दलघमीच पाणी दिल्याने आता मृत साठ्यातून वेगवेगळ्या मोटारी लावून पाणी घेण्याचे काम सुरू आहे. काल रात्री वजिराबाद पाणी टाकीवर विरोधी पक्षनेत्या गुरुप्रीतकौर सोढी यांचे पती दिलीपसिंघ सोढी यांनी दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची तक्रार दाखल झाली आहे. त्याबद्दल आम्ही गुन्हा दाखल करत असल्याचे माळी यांनी सांगितले. कायदा हातात घेवून पाणी सोडण्यासाठी अवैधरित्या दबावतंत्र वापरणाऱ्या मंडळींची गय केली जाणार नाही, असा इशाराही माळी यांनी यावेळी दिला.

पाणी पुरवठ्यासाठी आता उपायुक्त विलास भोसीकर यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली असून, सर्वसाधारण पाणीपुरवठ्यासाठी कार्यकारी अभियंता अंधारे आणि हातपंप दुरुस्तीसाठी सुनील देशमुख यांची नियुक्ती करण्यात आल्याचे माळी यांनी सांगितले. सिध्देश्वर धरणातून दोन दिवसापूर्वी निघालेले पाणी उद्या सकाळी नांदेडात पोहंचेल. मात्र या मार्गावर मोटारी लावून कोणी पाणी घेण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचेही माळी यांनी सांगितले.

शहरात सध्या २० टँकरद्वारे वेगवेगळ्या भागात पाणीपुरवठा करण्यात येत असून, येत्या दोन दिवसात आणखी काही टँकर वाढविले जातील. त्या त्या भागाची गंभीर परिस्थिती लक्षात घेवून प्राधान्यक्रमाने पाणीपुरवठा केला जाईल. सिध्देश्वर धरणातून सोडण्यात आलेले पाणी नांदेडकरांना या महिन्याअखेरपर्यंत पुरु शकेल. सध्या पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असून, गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचे दिवस आणखी वाढविले जातील, असेही त्यांनी सांगितले. पाणीपुरठ्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी देखील स्वतःचे टँकर देऊ केले असून, काही ठिकाणी असलेला खासगी पाणीपुरवठा देखील या टँकरसाठी वापरला जात आहे. यामुळे वेगवेगळ्या वार्डात पाणीपुरवठा टँकरव्दारे केला जात आहे. हे टँकर येत्या आठवडाभरात आणखी वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्याचे माळी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या