नांदेड-प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाची बाजी? संबंध महाराष्ट्राचे लक्ष


विजय जोशी, नांदेड

नांदेड लोकसभा मतदारसंघातील मतदान केवळ दोन दिवसावर येऊन ठेपल्यामुळे सर्व पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचा जोर सहाजिकच वाढविला आहे. काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांना यावेळी कधी नव्हे एवढे तगडे आव्हान मिळाल्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी केवळ प्रतिष्ठेचीच नव्हे तर अस्तित्वाची ठरली आहे.

आता कोणत्या उपायाने आपल्या विरुद्ध वाहत असलेले वारे थोपवून याची काळजी त्यांना लागली आहे. आपला परंपरागत मतदारसंघ आपल्या हातून निसटत चालल्याचे पाहून ते अस्वस्थ झाले आहेत. आता अगदी जीवाच्या आकांताने आपला बालेकिल्ला राखण्यासाठी ते प्रयत्नाची शर्थ करीत आहेत. यामुळेच राज्याचे प्रदेशाध्यक्ष आपल्याच मतदारसंघात तळ ठोकून बसले आहेत.

यावेळेसची निवडणूक प्रक्रिया सुरू होतानाच महायुतीने प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासारखा तुल्यबळ उमेदवार दिल्यामुळे राजकीय सारीपाटावर पहिले दान अशोक चव्हाणांच्या विरोधात गेले. त्यानंतर महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी घेतलेल्या सभा आणि शिस्तबध्द पध्दतीने चालू असलेला प्रचार यामुळे चव्हाणांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यातच नव्याने स्थापन करण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार उभा करीन अशोक चव्हाणांपुढे अडचणींचा डोंगर उभा केला. वंचित बहुजन आघाडीमध्ये एमआयएमने सहभाग घेतला. त्यामुळे मुस्लिम मतदारांवरही परिणाम झाला. वंचित बहुजन आघाडीशी बोलणी सुरू असल्यामुळे अशोक चव्हाणांना काहीतरी तडजोड निघेल आणि आपला विजयाचा मार्ग सुकर होईल असे वाटत होते. परंतु बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व जागी आपले उमेदवार उभे केल्यामुळे बोलणी फिस्कटली आणि चव्हाण यांच्यापुढील आव्हान अधिक तीव्र झाले.

अशोक चव्हाण यांचा त्यांच्या पक्ष कार्यकत्र्यांशी झालेला संवाद व्हायरल झाल्यानंतर अशोक चव्हाणांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली. आपले पक्षात कोणीच ऐकत नाही, अशी कबुली त्यांनी दिल्यामुळे आणि ती व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने त्यांना चांगलाच फटका पडला. याशिवाय महाराष्ट्रात इतरत्र काँग्रेसमधून महायुतीमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढत चालल्यामुळे एकंदर काँग्रेसचीच स्थिती दयनीय झाली. त्याचा परिणाम साहजिकच नांदेड मतदारसंघावर झाला. त्यानंतर चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा रद्द झाल्याची अफवा पसरविल्याच्या संदर्भात ओमप्रकाश पोकर्णा यांनी पुराव्यासह तक्रार दिली. याबाबत अद्यापही प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. मात्र चव्हाणांसारख्या प्रतिष्ठित नेत्याने अशा प्रकारच्या अफवा पसरवाव्यात याची जनतेमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली.

2014 ची निवडणूक आणि आताची निवडणूक यात मुख्य फरक असा आहे की, 2014 मध्ये अशोक चव्हाणांसोबत ओमप्रकाश पोकर्णा, दिलीप कंदकुर्ते आदी नेते होते. त्यांनतर काँग्रेसमधून अशोक चव्हाणांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता स्थिती अशी आहे की, अशोक चव्हाणांचे सर्व फंडे माहिती असलेले नेते भाजपकडे आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण कोणती खेळी खेळतील याची कल्पना भाजपच्या पक्षश्रेष्ठींना या नेत्यांकडून मिळते.

अल्पसंख्यांकांनी चव्हाणांपासून काढता पाय घेतल्यामुळे त्यांच्या हक्काच्या मतावर त्यांना पाणी सोडावे लागत आहे. एकीकडे वंचित बहुजन आघाडीने चव्हाणांसमोर उभे केलेले आव्हान दुसरीकडे शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे गावपातळीवर असलेले सबंध आणि सोयरेपण याचा फायदा महायुतीला होणार हे स्पष्ट दिसत असून, नांदेड लोकसभा मतदारसंघ यावेळी वेगळा इतिहास घडवेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

१८ एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, दळणवळण मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संभाजी पाटील, बबनराव लोणीकर आदींच्या तर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या वतीने राहूल गांधी, गुलाम नबी आझाद, छगन भुजबळ, चंद्रकांत हंडोरे, वसंत पुरके आदींच्या सभा झाल्या. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवैसी यांच्या सभा झाल्या. गेल्या पंधरा दिवसातील तापलेले वातावरण आणि चार महत्त्वाच्या पक्षांनी केलेला प्रचार यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. त्यामुळे काँग्रेसचा परंपरागत असलेला हा मतदारसंघ यावेळी नवी क्रांती घडविणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.