भीमा-कोरेगाव घटनेचे नांदेडात पडसाद, जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली

सामना प्रतिनिधी । नांदेड

भीमा-कोरेगाव घटनेविरोधात बंदला परवानगी न दिल्याने काही अज्ञात समाजकंटकांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या गाडीच्या काचा फोडून गाडीचे मोठे नुकसान केले. अन्य दहा ते पंधरा खासगी वाहनांवर व एसटी बसेवरही दगडफेक करण्यात आली आहे. या प्रकारांमुळे मंगळवारी शगहरातील सर्व शाळा बंद करण्यात ठेवण्यात आल्या होत्या. तोडफोड व दगडफेकीच्या घटनामुळे अनेक भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावला आहे.

भीमा-कोरेगाव येथे काल घडलेल्या घटनेमुळे नांदेड शहरात काल रात्रीपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले. काल रात्री सिडको भागात एस.टी.च्या दोन वाहनावर तसेच दोन खाजगी वाहनावर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी गाड्यांचे मात्र नुकसान झाले आहे. रात्रीच्या तणावामुळे लगेच हॉटेल व अन्य व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद केली.

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे भीमा-कोरेगावच्या घटनेच्या संदर्भात आज नांदेड बंदचे आवाहन करण्याचे पत्र देण्यात आले होते. मात्र या बंदला त्यांनी परवानगी नाकारली. काही अज्ञात समाजकंटकांनी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या शासकीय गाडीची तोडफोड केली. यामुळे गाडीच्या काचा फुटल्या असून, बोनेटचेही नुकसान झाले आहे.