नांदेडचे महापौर आणि उपमहापौर बुधवारी राजीनामा देणार ?

153

सामना ऑनलाईन, नांदेड

लोकसभा निवडणुकीचा निकाल तोंडावर आला असताना उद्या होणाऱ्या महापालिकेच्या पाणीटंचाईसंदर्भातील विशेष सभेत महापौर शीलाबाई किशोर भवरे आणि उपमहापौर विनय गिरडे पाटील हे दोघेही राजीनामा देण्याची शक्यता आहे. यापूर्वी बाजार समितीचे अध्यक्ष बी.आर.कदम यांचा दहा दिवसांपूर्वी तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे दिनकर दहिफळे यांनीही राजीनामा दिला होता.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची पाणीटंचाईवर विशेष सर्वसाधारण सभा बुधवारी मनपा सभागृहात होणार आहे. निवडणुकीनंतर अनेक मनपा सदस्यांनी सव्वा वर्षाच्या कालावधीची आठवण करुन देत महापौर व उपमहापौर पदाचा राजीनामा घेवून नव्या उमेदवारांना संधी द्यावी अशी मागणी केली होती. या मागणीने वेग धरल्यानंतर महापौर व उपमहापौरांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे सोपविला होता. निवडणुकीचा निकाल लागण्याच्या एक दिवस अगोदरच म्हणजे २२ मे रोजी या दोघांना आपल्या पदाचा राजीनामा या सभागृहात देण्याचे आदेश काँग्रेसने जारी केले आहेत.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-74, भाजप-6,  शिवसेना-1 आणि अपक्ष-1 असे पक्षीय बलाबल तयार झाले आहे. अपक्ष उमेदवाराने काँग्रेसला पाठिंबा दिल्याने काँग्रेसचे संख्याबळ 75 झाले आहे. काँग्रेसने या निवडणुकीनंतर महापौर आणि उपमहापौर यांचा कालावधी सव्वा वर्षाचा असेल असं जाहीर केलं होतं. 1 नोव्हेंबर 2017 रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी शrलाबाई किशोर भवरे यांची तर उपमहापौर पदी विनय गिरडे यांची बहुमताने निवड झाली होती.

निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे महापौर आणि उपमहापौर यांचा कालावधी 17 महिन्यांचा झाला आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर महापौर, उपमहापौर बदलाच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.  आचारसंहिता संपण्याच्या अगोदरच म्हणजे बुधवारी या दोघांनाही आपल्या पदाचे राजीनामे द्यावे लागणार आहेत. नव्या महापौरांची निवड आता लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या आधारावर केले जाईल असं बोललं जात आहे. महापौरपदाच्या शर्यतीत ज्योती सुभाष रायबोले, कदम ज्योती मनिष, पूजा बालाजी पवळे, सोनकांबळे गंगाबाई मल्हारी, कापूरे गितांजली रामदास, धबाले दिशा कपील, गोडबोले ज्योत्सना राजू आणि सौ.गायकवाड चित्रा सिध्दार्थ या अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून नवा महापौर निवडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्याचे महापौर व उपमहापौर यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या महापौर व उपमहापौरांना केवळ तेरा महिन्याचा कालावधी मिळणार आहे. त्यातील 90 दिवस विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत जाणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या