फोडाफोडीचे अपयश!

मोदी लाटेच्या उदयापासून भाजप विजयाचा चौखूर उधळलेला वारू अशोक चव्हाणांनी रोखला. भाजपच्या घोडदौडीला लगाम घातला वगैरे वगैरे विश्लेषण नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झाले आहे. आणखी दोन-चार दिवस त्यावर काथ्याकूट होत राहील. एक मात्र खरे की, निप्राण झालेल्या काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्याचे काम नांदेड महापालिकेच्या निवडणुकीने केले आहे. नांदेडकरांनी दिलेला हा कौल तसा बुचकळय़ात टाकणारा असला तरी जनमताचा आदर राखून तो सर्वच राजकीय पक्षांना स्वीकारावा लागेल.

राज्यभर गाजलेल्या नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची एकूणच व्यूहरचना यशस्वी ठरली आणि नांदेडात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले, हे आता मान्य करावेच लागेल. ८१ सदस्य संख्या असलेल्या नांदेड महापालिकेत तब्बल ७० हून अधिक जागा जिंकून काँग्रेसने सर्वच राजकीय पक्षांना चकित केले. शिवसेनेला  या निवडणुकीत म्हणावे तसे यश मिळाले नाही. हे अपयश म्हणा किंवा पराभव, त्याचा जो काय अभ्यास करायचा तो शिवसेना आपल्या पद्धतीने करेलच. मात्र एकाच वेळी अशोक चव्हाणांची काँग्रेस आणि साम, दाम, दंड, भेद या सर्व नीती-अनीतींचा अवलंब करणाऱया भाजपशी आमच्या सामान्य शिवसैनिकांनी त्याच्या परीने दोन हात केले, संघर्ष केला, हे आम्ही अभिमानाने सांगू शकतो. निवडणुका जिंकण्यासाठी हाडके फेकून मासे गळाला लावणे किंवा जाती-पातींच्या मोटा बांधून मतांची बेगमी करणे अशी थेरं शिवसेनेला कधीच जमली नाहीत, किंबहुना जमणारही नाहीत. त्यामुळे अलीकडच्या काळात हमखास वापरल्या जाणाऱया या  निवडणूक तंत्रात शिवसेना कुठे कमी पडली असेल तर त्याचा पश्चात्ताप करण्याचेही कारण नाही. संपूर्ण देश काँग्रेसमुक्त करण्याचे उद्दिष्ट डोळय़ांसमोर ठेवणाऱया आमच्या मित्रपक्षासाठी मात्र नांदेडचा निकाल अधिक धक्कादायक आहे. भाजपचा पराभव होऊ शकतो, असा स्पष्ट संदेश या निवडणुकीने देशभर गेला आहे. पुन्हा हा पराभव साधासुधा नाही. दिल्ली विधानसभेत

आम आदमी पार्टीने जशी

भाजपला आपटी दिली होती तशीच ही धोबीपछाड आहे. लातूरपाठोपाठ  नांदेडही जिंकणार आणि इथेही भाजपचाच महापौर होणार, अशा राणाभीमदेवी गर्जना भाजपची नेतमंडळी दणक्यात करत होती. निकाल जाहीर झाल्यानंतर महापौरपदी कोणाला बसवायचे, स्थायी समितीवर कोणा-कोणाला पाठवायचे इथपर्यंत सगळी तयारी झाली होती. निकालानंतर जल्लोष करण्यासाठी फटाक्यांची गोदामेही भरून ठेवली होती. मात्र या सगळय़ाच स्वप्नांचा चक्काचूर झाला. भाजपच्या नेतृत्वाचे सगळेच कष्ट नांदेडच्या जनतेने वाचवले आणि  पुन्हा एकदा महापालिका काँग्रेसच्याच झोळीत टाकली. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठsची केली होती. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांपासून भाजपचे सर्वच मंत्री सर्वशक्तीनिशी या निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. तरीही भारतीय जनता पक्षाचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. सत्ता आणि पैशाचा वारेमाप वापर आणि आयाराम-गयारामांना मिठय़ा मारूनही जनतेने आपल्याला का झिडकारले, याचे चिंतन वगैरे यथावकाश होत राहील. मात्र फोडाफोडीचे आणि थैलीशाहीचे राजकारण सदासर्वकाळ यशस्वी होत नसते, हा या निवडणुकीचा सर्वात मोठा धडा आहे. महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागताच भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकांप्रमाणेच आयारामांचे दुकानच उघडले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे तब्बल पंधरा नगरसेवक भाजपने आपल्या तंबूत दाखल करून घेतले. या सर्वांच्या हातात कमळ देऊन भाजपने त्यांना उमेदवारी दिली. आपापल्या पक्षांशी बेईमानी करून गेलेल्या बहुतांश

नव्या ‘कमलदल’धा-यांना नांदेडकरांनी

चिखलात घुसळून पार उलथेपालथे केले. अशोक चव्हाणांनी मात्र भाजपकडून आत्मसात केलेला फोडाफोडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. एमआयएमच्या सहा नगरसेवकांना फोडून काँग्रेसने त्यांना तिकिटे दिली आणि निवडूनही आणले. मागच्या निवडणुकीत एमआयएमचे ११ नगरसेवक निवडून आले होते. यावेळी मात्र ओवेसी बंधूंच्या चार-चार सभा होऊनही नांदेडच्या मुस्लिमांनी एमआयएमला खातेही उघडू दिले नाही. तिथेच काँग्रेस जिंकली. दलित आणि मुस्लिम या पारंपरिक व्होट बँकेला सोबत घेतानाच इतर जातीजमातींची मोट बांधण्याची अशोक चव्हाणांची खेळी यशस्वी ठरली. याउलट नांदेड महापालिकेची निवडणूक लढवण्यासाठी स्वतःची म्हणावी अशी फौजच भाजपकडे नव्हती. इतर पक्षांतील नगरसेवक फोडून त्यांनाच तेल लावून भाजपने मैदानात उतरवले. शिवाय एका ‘बेडूकछाप’ आमदाराला सगळी जबाबदारी दिल्याने आहे तो जुना परिवारही नाराज होऊन बसला. मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन प्रचार सभा घेतल्या.  ‘अशोकराव, तुमचा किल्ला उद्ध्वस्त होत आहे. नांदेडात लोणचे घालायलाही काँगेस उरणार नाही,’ असा फाजील आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. मुख्यमंत्र्यांची सगळी मदार त्या ‘बेडूकछाप’ आमदारावर  होती. तिथेच त्यांचा घात झाला. मोदी लाटेच्या उदयापासून भाजप विजयाचा चौखूर उधळलेला वारू अशोक चव्हाणांनी रोखला. भाजपच्या घोडदौडीला लगाम घातला वगैरे वगैरे विश्लेषण नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झाले आहे. आणखी दोन-चार दिवस त्यावर काथ्याकूट होत राहील. एक मात्र खरे की, निप्राण झालेल्या काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्याचे काम नांदेड महापालिकेच्या निवडणुकीने केले आहे. नांदेडकरांनी दिलेला हा कौल तसा बुचकळय़ात टाकणारा असला तरी जनमताचा आदर राखून तो सर्वच राजकीय पक्षांना स्वीकारावा लागेल.