नांदेड-मुंबई मार्गावर सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करा!


सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेड-मुंबई मार्गावर सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करणे, नांदेड-पुणे मार्गावरची रेल्वे वाहतूक दररोज करणे, नांदेड-परभणी मार्गाचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण करणे यासह आठ मागण्यांचे निवेदन रेल्वे संघर्ष समितीचे निमंत्रक शंतनू डोईफोडे यांनी शिष्टमंडळासह रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना दिले.

या निवेदनात प्रथमच नांदेड, देगलूर, बीदर या रेल्वे मार्गास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्याबद्दल आणि निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल रेल्वे मंत्र्यांचे आभार मानण्यात आले आहेत. तसेच हा मार्ग शीख धर्मियांच्या दोन तीर्थस्थानांना जोडणारा असल्यामुळे हा मार्ग नांदेडमधील शीख बांधवांसाठी हितावह निर्णय आहे, असेही निवेदनात म्हंटले आहे. या मार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण करण्यात यावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

नांदेड ते पुणे या मार्गावर नांदेड-पनवेल ही गाडी आठवड्यातून सहा दिवस आहे. ती गाडी दररोज करावी, या मागणीचाही या निवेदनात समावेश आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असल्यामुळे शासकीय कामासाठी नांदेडहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या मार्गावर सध्या नंदीग्राम आणि देवगिरी एक्सप्रेस सुरू आहे. तथापी या गाड्या अपुऱ्या असल्यामुळे नांदेड ते मुंबई नवी सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करावी, असेही निवेदनात म्हंटले आहे. परभणी ते नांदेड दुहेरीकरणाच्या कामाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या कामासाठी अर्थसंकल्पात तरतूद होणे गरजेचे होते. ते झाले नाही हे निदर्शनास आणून देवून तशी तरतूद करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

नांदेड-अहमदपूर आणि लातूर रोड या मार्गाच्या सर्वेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. पण काम अद्याप सुरू झालेले नाही. हे काम लवकर सुरू करावे आणि वेगाने पूर्ण करावे, असेही निवेदनात म्हंटले आहे. नांदेड-तुळजापूर-धाराशिव-बीड-संभाजीनगर-जळगाव या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, संभाजीनगर व जालना मार्गे हा मार्ग प्रस्तावित आहे. या मार्गास लवकर मंजुरी मिळावी असेही निवेदनात म्हंटले आहे. रोटेगाव-पुलतांबा ही तीस किलोमीटरचे कार्डलाईन टाकली तर पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. तसेच पूर्णा येथे लोकोशेड होते यात इंजिनची दुरुस्ती करण्यात येत होती. कोळसा इंजिन बंद झाल्यामुळे हा कारखाना बंद झाला. त्याठिकाणी आता डिझेल इंजिन दुरुस्त करण्यासाठी लोकोशेड उभारण्यात यावा, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

दक्षिण मध्य रेल्वेचा नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्यात यावा ही मराठवाड्यातील जनतेची बऱ्याच दिवसांची मागणी आहे. दक्षिण मध्य रेल्वेचे सिकंदराबाद हा तेलगू धार्जिणा विभाग असून, या विभागाच्या वतीने महाराष्ट्रात फक्त नऊ किलोमीटर लोहमार्ग अंथरण्यात आला आहे. या पक्षपातामुळे नांदेड विभागातील जनतेवर अन्याय होत असून, नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडावा ही मागणी त्वरित मान्य करावी, असेही निवेदनात म्हंटले आहे.

मराठवाड्याच्या पदरात रेल्वेने खूप काही दिले आहे, परंतू अद्यापही खूप काही देणे बाकी आहे. असे म्हणून महाराष्ट्राच्या विकासात महत्वाचे स्थान असलेल्या रेल्वेच्या विकासाची गती वाढवली तर या भागाचा चेहरामोहरा बदलेल असेही निवेदनात म्हंटले आहे. हे निवेदन शंतनू डोईफोडे यांनी डॉ.दि.भा.जोशी, प्रवीण साले, चैतन्यबापू देशमुख यांच्यासोबत रेल्वेमंत्री पियूष गोयल यांना दिले.