नांदेड वाघाळा महानगरपालिकेने बर्कीचौकसह अनेक भागातील अतिक्रमण हटवले

3
nanded-waghala

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेड वाघाळा महानगरपालिकेने मंगळवारी बर्कीचौकसह अनेक भागातील अतिक्रमण काढले आहे.

महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाने सकाळी आठ वाजल्यापासून बर्कीचौक, हबीब टॉकीज, जुनामोंढा, गुरुव्दारा चौक, वजिराबाद पर्यंत रस्त्यावर आणि पादचारी रस्त्यावर असलेल्या अनेक अतिक्रमणांना बाजूला केले. यामुळे सर्वसामान्य माणसांच्या वाहतुकीस रहदारीस अडथळा करणारे कटलरी सामान, पाटपऱ्या, चहाच्या टपऱ्या, फळविक्रेत्यांचे हातगाडे, फुटपाथ व नालीवर दुकानदाराने ठेवलेले साहित्य काढून घेण्यात आले. अतिक्रमण विभागाने हे काम करण्यासाठी ट्रॅक्टर्स, टेम्पो, जेसीबी मशिनचा वापर केला. हे अतिक्रमण उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण विभागाचे प्रमुख रहिस पाशा, त्यांचे सहकारी, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक झडते, त्यांचे सहकारी, क्षेत्रिय अधिकारी गच्चे, स्वच्छता निरीक्षक गोविंद थेटे, वसिम तडवी, दयानंद कवले, मनपा पोलीस पथक प्रमुख काझी आणि त्यांचे सहकारी या सर्वांनी परिश्रम घेवून पूर्ण केले.

महानगरपालिकेने जनतेला आवाहन केले आहे की, रस्त्यावर अशा प्रकारे वाहतुकीस व रहदारीस अडथळा करणारे सर्वच अतिक्रमण काढले जाणार आहे. त्यामुळे असे कोणतेही अतिक्रमण कोणी केले असेल तर ते बाजूला काढून घ्यावे अन्यथा कायदेशीर पध्दतीने ते काढले जाणार आहे.