नंदिता धुरी… पक्की फुडी आणि मांसाहारी


‘मी पक्की फुडी आणि मांसाहारी आहे. मासे प्रचंड आवडतात. गोड पदार्थही आवडतात, पण मासे खाण्याकडे कल जास्त आहे’, अशी शब्दात अभिनेत्री नंदिता धुरी आपल्या मत्स्य प्रेमाविषयी सांगितलं…

> ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या?

– ‘आनंद’, ‘समाधान’.

> खायला काय आवडतं?

– मी पक्की फुडी आणि मांसाहारी आहे. मासे प्रचंड आवडतात. गोड पदार्थही आवडतात, पण मासे खाण्याकडे कल जास्त आहे. मला सगळ्याच पदार्थांची चव चाखायला जास्त आवडते.

> खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता?

– फिटनेससाठी व्यायाम, योगा, ट्रेकिंग करते. दररोज चालते. खाण्यावर नियंत्रण ठेवावं लागतं.

> डाएट करता का?

– कठीण काम आहे. कारण खाण्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. तरीही करते आणि अगदी मन मारून खात नाही.

> आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता?

– नाटकाच्या दौऱयांसाठी फिरत असताना तिथले वैशिष्टय़पूर्ण पदार्थ नक्की खातेच.

> कोणत्या हॉटेलमध्ये जाता?

– जिथे उत्तम चवीचं जेवण मिळतं. प्रत्येक वेळी मोठय़ा हॉटेल्सपेक्षा कधीतरी जिथे चविष्ट पदार्थ मिळत असेल तर रोडसाईडवरचही खाते.

> कोणतं पेय आवडतं?

– पन्ह आणि सोलकढी अत्यंत आवडते.

> प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता?

– तेव्हा खाणं आपल्या हातात नसतं. रात्री उशिरा जेवणं टाळते आणि प्रमाणात खाते. नाटकानंतर खूप भूकही लागते तेव्हा प्रमाणात खाते. चहा, कॉफी टाळते.

> स्ट्रीट फूड आवडतं?

– खूपच.

> स्वयंपाकात काय आवडतं?

– कुळिथाची पिठी, कोशिंबिरी. दौऱयानिमित्त बाहेर असल्यामुळे घरचं साधं जेवणं खूप हवहवंसं वाटतं.

> पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा?

– मला स्वयंपाकापेक्षा स्टार्टर्स करायला जास्त आवडतात. ड्राय प्रॉन्स, प्रॉन्स ग्रेव्ही, पनीरचे पदार्थ करायला जास्त आवडतात.

तेलातलं बोंबिल कालवण

ओले बोंबिल कापून स्वच्छ धुऊन घ्यायचं. एका पातेल्यात ते घेऊन त्यावर तेल आणि भरपूर लसूण घालायचे. त्यावर तिखट, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, कोकम घालायचे. वरून चवीनुसार मीठ घालायचं. वरून अगदी कमी पाणी घालायचं. नंतर गॅसवर ठेवायचं. वाफ आली आणि बोंबिल शिजले की, गॅस बंद करायचा. अगदी कमी वेळात होणारी आणि अत्यंत चविष्ट अशी ही रेसिपी आहे.