नांदुरमधमेश्वर धरण रुतले गाळात 70 टक्के भरल्याने क्षमता झाली कमी

4

सामना आॅनलाईन, निफाड

दि. 11 (सा. वा.) – नाशिक, संभाजीनगर, नगर जिह्यांतील अनेक मोठय़ा शहरांना पाणीपुरवठा करणारे निफाड तालुक्यातील नांदुरमधमेश्वर धरण सध्या गाळात रुतले आहे. शंभर वर्षांपूर्वी बांधलेले हे धरण 70 टक्के गाळाने भरले आहे.

नाशिक, संभाजीनगर, नगर जिह्यांतील शिर्डी, कोपरगाव, निफाड, सिन्नर, येवला, वैजापूर, लासलगाव, विंचुर, येवला, कोळपेवाडी या मोठय़ा शहरांना पाणीपुरवठा आणि हजारो हेक्टर शेती वर्षानुवर्षे ओलिताखाली ठेवणारे निफाड तालुक्यातील नांदुरमधमेश्वर धरण जवळपास शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांनी दूरदृष्टी वापरून बांधले. धरणात गोदावरी, कादवा, बाणगंगा नदीचे पाणी येते तर गंगापूर, दारणा, वालदेवी, मुकणे, कडवा, ओझरखेड या नाशिक जिह्यातील मोठय़ा धरणातील पाणी येते. धरण बांधले तेव्हा धरणाची पाणी साठवणूक क्षमता 1050 दशलक्ष घनफूट होती. अनेक दशकांनंतर गाळ साचल्याने आज केवळ 250 दशलक्ष घनफूट पाणी साठवणूक होईल एवढेच शिल्लक राहिले आहे.

मोठी क्षमता असलेले धरण आज कादवा, गोदावरी नदीच्या प्रवाहात वाहात येणाऱया गाळामुळे जवळपास 70 टक्के भरले असून क्षमता कमी झाल्याने सलग दुसऱया वर्षी धरण कोरडेठाक पडले. अनेक दशके तळ पाहिला नसल्याने आता सलग तीन वर्षांपासून तळ कोरडे पडत असल्याने धरणाची क्षमता कमी झाली आहे आणि भविष्याचा मोठा धोका वाढतो आहे.

नांदुरमधमेश्वर धरण क्षेत्रात काळी सुपीक जमीन आहे. पावसाळय़ात पाण्याचा प्रवाह आल्याने माती वाहून येते. वर्षानुवर्षे वाहत येणाऱया मातीने धरण गाळयुक्त झाले आहे. धरणात जलसाठा होईल इतकी जागाच शिल्लक राहिली नाही. मुख्य दरवाजे असलेल्या ठिकाणी अवघे पाच ते सात फूट उंची शिल्लक आहे तर काही ठिकाणी गाळ पूर्णपणे धरण भिंतीच्या समांतर साचत आला आहे

गाळ साचल्याने पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे पावसाळय़ात पाणी वाढले की गोदावरीला पूर येतो. सायखेडा, चांदोरी या गावांना पुराचा फटका बसतो. दहा वर्षांपूर्वी धरणाला आठ वक्रकार गेट तयार करण्यात आले, मात्र वक्रकार गेटमधून गाळ बाहेर पडत नाही. साचलेला गाळ आणि गेट यांचे अंतर असल्याने केवळ पाणी वाहून जाते. गाळ वाहून जात नसल्याने वर्षानुवर्षे वाहून आलेल्या गाळामुळे धरण गाळाने भरले आहे. त्यामुळे पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे.