ओसाका अमेरिका ओपनची नवी राणी,सेरेनाचे 24 व्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाचे स्वप्न भंगले

सामना ऑनलाईन, न्यूयॉर्क

यंदा मार्च महिन्यात मियामी ओपन टेनिस स्पर्धेत टॉपची टेनिस तारका सेरेना विल्यम्सला पराभवाचा झटका देणाऱ्या जपानच्या नाओमी ओसाकाने तसाच पराक्रम पुन्हा एकदा केला आहे. अव्वल मानांकित सेरेनाला ओसाकाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत यजमान देशाच्या सेरेनाला 6-2, 6-4 असे सहज पराभूत करून आपल्या कारकीर्दीतील पहिल्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदावर आपले नाव कोरले. या लढतीला लागलेल्या वादाच्या गालबोटाने सेरेना आणि ओसाका या दोघींनीही खंत व्यक्त केली.   ग्रॅण्डस्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकाकणारी नाओमी ओसाका ही पहिलीच जपानी खेळाडू ठरली आहे.

सेरेना विल्यम्सची कारकीर्दीतील ‘यूएस ओपन’मधील नववी आणि ग्रॅण्डस्लॅममधील 31 वी फायनल होती. मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक 24 विजेतीपदांच्या विक्रमाची बरोबरी साधण्याची संधी सेरेनाला होती, मात्र तिला यात यश आले नाही. अखेरच्या सेटमध्ये अमेरिकन कोच पॅट्रिक मोरॅटोग्लू यांनी लढत सुरू असताना सेरेनाकडे पाहून इशारा करीत काही सूचना दिल्याने पोर्तुगीज चेअर पंच कार्लोस रामोस यांनी ओसाकाला एक गेम बहाल केला.

मला चीटर ठरवणे कितपत योग्य! -सेरेना

माझा माझ्या खेळावर आणि कर्तृत्वावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी फसवेगिरी करणे माझ्या रक्तात नाही. चेअर पंच रामोस यांनी माझ्यावर जो फसवेगिरीचा ठपका ठेवला आणि गेम ओसाकाला बहाल केला त्यामुळे मी अतिशय दु:खी झाले आहे असे सांगताना सेरेनाला आपल्या अश्रूंचा बांध रोखता आला नाही. मी चीटर मुळीच नाही. उलट महिला टेनिसपटूंना न्याय मिळावा आणि समानतेची वागणूक मिळावी म्हणून मी लढते. माझे माजी पंच मोरॅटोग्लू यांनी मला हाताने खुणा करून काही सूचना केल्या असा आरोप ठेवून पंच रामोस यांनी माझ्याविरुद्ध प्रतिस्पर्धी खेळाडूला गेम बहाल केला. हीच पुरुषांची लढत असती तर पंचांनी  निर्णय वेगळाच दिला असता अशी प्रतिक्रिया सेरेनाने क्यक्त केली.