आसाराम बापूचा मुलगा नारायण साईं बलात्कार प्रकरणात दोषी

2

सामना ऑनलाईन । सूरत

आसाराम बापू याचा मुलगा नारायण साई हा बलात्कार प्रकरणात दोषी सिद्ध झाला आहे. सूरत येथील सत्र न्यायालयात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत नारायण साई याच्यावरील गुन्हे सिद्ध झाले असून 30 एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, सूरत येथील दोन बहिणींनी नारायण साई याच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. पोलिसांनी दोन्ही बहिणींचे जबाब आणि पुराव्यांच्या आधारे नारायण साईविरोधात तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण तब्बल 11 वर्षं जुनं असून आतापर्यंत नारायण साईच्या विरोधात 53 साक्षीदारांनी आपली साक्ष नोंदवली आहे. यातील बहुतेक साक्षीदारांनी नारायण साईच्या विकृतीला अनेक तरुणी आणि मुली पडत असल्याचं प्रत्यक्ष पाहिलं होतं आणि त्यात नारायण साईची मदतही केली होती. मात्र काही काळानंतर ते साक्षीदार झाले होते.

नारायण साईवर आरोप झाल्यानंतर तो फरार झाला होता. 2013मध्ये हरयाणा-दिल्ली सीमेनजीक नारायण साईला अटक करण्यात आली होती. बलात्काराखेरीज नारायण साईवर पोलिसाला 13 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोपही झाला होता. मात्र, या प्रकरणी त्याला जामीन मिळाला आहे.