नरेंद्र मोदींनी देशातील काळा पैसा सफेद केला

 

पुणे – नोटाबंदीमागचा काळा पैसा नष्ट करण्याचा उद्देश पूर्णपणे फसला आहे. देशामध्ये हजार, पाचशे रुपयांच्या स्वरूपात फक्त सहा टक्के काळा पैसा होता. या सर्व नोटा आतापर्यंत कोणत्या ना कोणत्या पद्धतीने बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. त्यामुळे काळा पैसा नष्ट करण्याचा उद्देश फसला असून, मोदींनी देशातील सर्व रोख स्वरूपातील काळा पैसा सफेद केला आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
लोकमान्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ‘नोटाबंदी व त्याचे परिणाम’ या विषयावर चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नगरसेवक अभय छाजेड, रोहित टिळक, संजय बालगुडे आदी यावेळी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, हिंदुस्थानच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या २५ ते ३० टक्के काळी अर्थव्यवस्था आहे. या काळ्या अर्थव्यवस्थेतील सहा टक्के रक्कम ही रोख स्वरूपात आहे, तर उर्वरित जमीन, सोने, परकीय चलन स्वरूपात आहे. सहा टक्के रोख स्वरूपातील काळी अर्थव्यवस्था संपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर हल्ला केला. नोटबंदीला पाठिंबा देणारे देशभक्त आणि विरोध करणारे देशद्रोही असे वातावरण निर्माण केले गेले.

मोदींनी काळ्या पैशाच्या साठ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निर्मिती थांबविण्याबाबत विचार केला नाही. तसेच चलनात मोठ्या नोटा नको, असे मोदी म्हणतात. मात्र, दोन हजारांची नोट चलनात का आणली? नोटाबंदीच्या निर्णयाची माहिती भाजपच्या लोकांना होती. त्यामुळे नोटाबंदीच्या आधीच भाजपने पक्षासाठी जमीन खरेदीचा सपाटा लावला होता.

मिलेटरी माइंड सेटचे मोदी
गुप्तता, अविश्‍वास, शांतता, सर्जिकल स्ट्राईक, हुकूमशाही पद्धतींचा वापर पंतप्रधान मोदी करीत आहेत. त्यामुळेच नोटाबंदीचा निर्णय घेताना मोदींनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना एका खोलीत बसविले होते. यावरून मोदी मिलेटरी माइंड सेटचे असल्याचे लक्षात येते.

परदेशी कंपन्यांसाठी कॅशलेसचा घाट
व्हिसा, मास्टर कार्ड, डिस्कव्हर या तीनही परदेशी कंपन्या आहेत. या कंपन्या कॅशलेस इकॉनॉमीसाठी हिंदुस्थानला मदत करणार आहे. कॅश व्यवहारांना कमिशन स्वरूपात एकही रुपाया खर्च येत नाही. मात्र, कॅशलेसमध्ये प्रत्येक व्यवहाराला दीड टक्के कमिशन मोजावे लागतेे.

मोदींनी जनतेची माफी मागावी
नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिकांना प्रचंड त्रास झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.

कॅशलेस नाही सेन्सलेस अर्थव्यवस्था
देशाचे राष्ट्रीय उत्पन्न १४० लाख कोटी एवढे आहे. त्यातील रोखीचे चलन १८ ते १९ लाख कोटी. या रोखीच्या चलनातील सहा टक्के काळा पैसा. हा काळा पैसा नष्ट करण्यासाठी संपूर्ण अर्थव्यवस्थेला वेठीस ठेवले गेले. देशात कॅशलेस नाही, तर सेन्सलेस अर्थव्यवस्था असल्याचे लक्षात येते, अशी टीका देसरडा यांनी केली.