फोन पे चर्चा ढुस्स्स्स!

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

‘एनडीए’तून तेलगू देसम पार्टीने बाहेर पडू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. पंतप्रधानांनी फोन करून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याबरोबर चर्चा केली; पण ती फिसकटली. अखेर तेलगू देसमच्या दोन केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन राजीनामे सुपूर्द केले आहेत, तर आंध्र प्रदेशात तेलगू देसम सरकारमधून भाजपाचे दोन मंत्री बाहेर पडले.

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी तेलगू देसम पक्षाने लावून धरली आहे. मात्र केंद्र सरकारने ही मागणी धुडकावल्यामुळे तेलगू देसमचे सर्वेसर्वा, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काल ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तेलगू देसमचे केंद्रातील मंत्री गजपती राजू आणि वाय.एस. चौधरी यांना राजीनामे भिरकाविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज या दोन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन राजीनामे दिले.

काल फोन घेतला नाही, आज फोनवर मनधरणी

तेलगू देसम एनडीएतून बाहेर पडत असल्याचे सांगण्यासाठी सौजन्य म्हणून काल चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला होता. पण पंतप्रधानांनी फोन घेतला नाही. आज मात्र पंतप्रधानांनी फोनवर चंद्राबाबूंशी चर्चा केली. एनडीएतून बाहेर पडू नये यासाठी पंतप्रधानांनी मनधरणी केल्याचे समजते. मात्र या फोन-पे चर्चाचा अधिकृत तपशील जाहीर झालेला नाही. दरम्यान, आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारमधील भाजपच्या दोन मंत्र्यांनीही राजीनामे दिले आहेत.