‘नॅश’चा वेणुनाद!

236

jyotsna-gadgil>>ज्योत्स्ना गाडगीळ

पं. रवि शंकर, पं. हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद झाकीर हुसैन, उस्ताद बिस्मिल्ला खाँ ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील मातब्बर मंडळी. ह्यांनी भारताचे संगीत जगभरात पोहोचवले आणि भारतीय शास्त्रीय संगीत ऐकणारे अनेक चाहते निर्माण केले. परदेशातील अनेक संगीतप्रेमी भारतात येऊन गुरुकुल पद्धतीने संगीताचे धडे गिरवू लागले. त्यातलेच एक नाव नॅश नॉबर्ट! अमेरिकेतील उच्चभ्रू घरातला हा तरुण पं. हरिप्रसाद चौरसिया ह्यांच्या बासरीवादनाला भुलून भारतात आला, बासरीवादन शिकला आणि मोठ्या तपश्चर्येनंतर बासरीवादक म्हणून नावरूपाला आला.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील अत्यंत मानाचा समजला जाणारा ६५वा `सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ येत्या ७ डिसेंबर रोजी होऊ घातला आहे. ह्या उत्सवात आपल्यालाही सादरीकरण करता यावे, अशी प्रत्येक शास्त्रीय संगीत कलाकाराची सुप्त इच्छा असते. अशाच एका संधीची वाट बघत आहे, बासरीवादक नॅश नॉबर्ट!

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील एका उद्योगपतीचा मुलगा नॅश नॉबर्ट, ह्याला बालपणापासून संगीताची आवड होती. तो अभ्यासात हुशार होताच, मात्र त्याला जागतिक संगीत ऐकण्याची विशेष आवड होती. बालपणीच त्याने विविध प्रकारची पाश्चात्य वाद्ये शिकण्यास सुरुवात केली होती. ते शिकत असतानाही मन:शांती देणारे संगीत कोणते, यादृष्टीने त्याचा शोध सुरू होता. ह्यासाठी त्याने वॉशिंग्टन येथील लिबरल आर्ट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

अवघ्या २१ व्या वर्षी नॅश जगाची मुशाफिरी करायला निघाला. जगभ्रमण करत असताना तो भारतात आला. भारतात येण्यासाठी तो उत्सुक होता. कारण, भारताचा इतिहास, भूगोल, संस्कृती याबरोबरच भारतीय अभिजात संगीताबद्दलही तो बरेच काही ऐकून होता. त्याने अनेक सांस्कृतिक, ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. जयपुरला असताना एका हॉटेलमध्ये मंद संगीत त्याच्या कानावर पडले. पं. रवि शंकर ह्यांच्या सतारवादनाची सीडी लावली होती. ते संगीत त्याला एवढे आवडले की, त्याने सतार शिकण्याचा निश्चय केला. परंतु, नियतीने त्याच्या हाती वेगळेच वाद्य द्यायचे ठरवले होते.

हाच दौरा सुरू असताना तो गुजरात दर्शन करत द्वारकेत पोहोचला. योगायोगाने तिथे एक सांगीतिक उत्सव सुरू होता. भारतीय संगीत प्रत्यक्ष ऐकण्याची संधी त्याला मिळाली. दिवस-रात्र चालणारे संगीत समारोह परदेशात होत नसल्याने त्याला कुतूहल वाटले. तो तिथेच ठिय्या मारून बसला. सतारीनंतर तबलावादनाने त्याच्यावर भुरळ घातली. त्याने मनोमन ठरवून टाकले, भारतात राहून आपल्याला सतार किंवा तबला शिकायचा आहे. परंतु, ती मैफल जशी अंतिम टप्प्यात आली, तसा पुन्हा नॅशचा इरादा बदलला आणि वाद्यही!

समारोहाची सांगता करण्यासाठी पं. हरिप्रसाद चौरसिया व्यासपीठावर आले आणि त्यांनी बासरीवादन सुरू केले. एव्हाना भारतीय संगीतात मनमुराद पोहण्याचा आनंद लुटत असलेला नॅश, पंडितजींचे बासरीवादन ऐवूâन संगीताच्या डोहात आकंठ बुडाला. नॅश, ज्या सुरांच्या शोधात होता, तो अंतर्यामी सूर त्याला गवसला आणि त्याने मनोमन पंडितजींचे शिष्यत्व पत्करले.

बासरीवादनाचे गमभन गिरवण्यासाठी नॅशने बनारस हिंदू विद्यापीठात एक वर्षाचा बासरीवादनाचा प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केला. बासरीवादनात विशेष प्रावीण्य घेण्यासाठी नॅशने मुंबई गाठली आणि पंडितजींच्या मुंबईतील आश्रमात गुरुकुल पद्धतीने शिकण्यास सुरुवात केली.

तेथील अनुभवाबद्दल विचारले असता नॅश सांगतो, `गुरुकुलात मी सहा वर्षे होतो. तेथील सांगीतिक वातावरण माझ्या अभ्यासासाठी पोषक होते. तिथे मी १२ ते १४ तास बसून रियाज करायचो. सीडी, कॅसेटवर वेगवेगळ्या कलाकारांचे गायन, वादन ऐकायचो. पंडितजींच्या शेकडो सीडींचे मी पारायण केले. सहा वर्षांनी मी स्वयंअध्ययन करायचे ठरवले. पंडितजींच्या सीडी ऐकून , आत्मसात करून माझी कला पुâलवण्याचा प्रयत्न सुरू केला. रियाजाने, सरावाने बासरीवादन मला चांगले जमू लागले आणि मी पंडितजींच्या वादनाचे केवळ अनुकरण न करता, स्वत:ची शैली विकसित करू शकलो.’

एकलव्याप्रमाणे चिकाटीने बासरीवादनाचे धडे गिरवणारा नॅश, आज बासरीवादक म्हणून नावरूपाला आलेला असला, तरी आपल्या कलेचे श्रेय तो पंडितजींनाच देतो. त्याचा आवडता राग कोणता, असे विचारले असता तो सांगतो, `पंडितजींनी वाजवलेले सगळेच राग माझ्या आवडीचे आहेत. ते मी सलग कितीही वेळ ऐकू शकतो.’

भारतीय संगीताचा प्रचार करण्यासाठी नॅशने अमेरिका, जपान, युरोपात अनेक कार्यक्रम केले आहेत. त्याने ‘इंद्रकली’ नावाचा स्वत:चा बॅण्डही स्थापन केला आहे. त्यात अनेक कलाकारांना सोबत घेऊन तो विविध सांगीतिक प्रयोग करीत असतो. भारतीय संगीत हे नव्या युगाचे संगीत आणि त्यात खूप शिकण्यासारखे आहे. समाधान आहे आणि ते जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले पाहिजे, असे नॅश सांगतो.

गेल्या १० -१२ वर्षांत नॅशने देश-परदेशात भारतीय शास्त्रीय संगीताचे अनेक महोत्सव आपल्या बासरीने गाजविले आहे. मुंबईतील दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, कर्नाटक संघापासून ते न्यूयॉर्कमधील छांदायन इंक, टोरोंटोमधील कॅटेलिस्ट ऑर्गनायझेशन आणि न्यू जर्सीतील रिदम इंटरनल अकॅडमीपर्यंत शेकडो ठिकाणी त्याच्या बासुरीला श्रोत्यांचे अलोट प्रेम मिळाले. गोव्यात नुकत्याच झालेल्या सुरश्री केसरबाई केरकर महोत्सवातही त्याला आमंत्रित करण्यात आले होते. पं. योगेश समसी, रामदास पळसुले, सत्यजीत तळवळकर, मुकुंदराज देव, आदित्य कल्याणपूर आदी कलावंतांसोबत त्याने मंच गाजविला आहे.

भारतीय संगीतात रुळलेल्या ह्या पाश्चात्य कलाकाराला बायकोही भारतीय मिळाली. तिचे नाव गेसिल. दोघेही संगीत क्षेत्रामुळे एकत्र आले, परंतु विरोधाभास असा की, नॅशने भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत, तर जेसिलने पाश्चात्य संगीताचे. ती उत्तम नर्तकीही आहे. ती `जॅझ’ संगीताचे तसेच `बॅलेडान्स’चे कार्यक्रम करते. नॅशच्या प्रत्येक कार्यक्रमात ती आवर्जून उपस्थित असते. वेळोवेळी प्रोत्साहन देते. तशीच नॅशचाही तिला प्रत्येक कार्यक्रमात पूर्ण पाठिंबा असतो.

नॅश एव्हाना भारतीयच नाही, तर मुंबईकरदेखील झाला आहे. मुंबईत राहून त्याला आता १५ वर्षे पूर्ण होतील. मुंबईचे लोक, खाद्यसंस्कृती, जनजीवन ह्याबद्दल तो भरभरून बोलतो. एवढेच नाही, तर `एकदा पाणीपुरीचा बेत आखूया’ असे निमंत्रणही देतो. एका परदेशी कलाकाराकडून भारतीय कलेचे, संस्कृतीचे गोडवे ऐकताना अभिमानाने ऊर भरून येतो. नॅशच्या प्रयत्नांना यश मिळो आणि सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात त्याचे बासरीवादन रसिकांना ऐकायला मिळो, हीच शुभेच्छा!

आपली प्रतिक्रिया द्या